नवी दिल्ली - कोणतेही वाहन चालवताना सोबत लायसन्स बाळगणे आतापर्यंत बंधनकारक होते. पण आता केंद्र सरकारने यामध्ये मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना त्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. यापुढे डिजिलॉकर किंवा एमपरिवहन या अॅपवर डाऊनलोड केलेले लायसन्स वैध धरण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र हे सुद्धा या अॅपवरूनच दाखवता येऊ शकेल. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये हे आदेश केंद्र सरकारने लागू केले होते. ते आता सर्व राज्य सरकारांना पाठविण्यात आले आहेत.
दुचाकी किंवा चारचाकी चालवताना जर वाहतूक पोलिस किंवा आरटीओच्या अधिकाऱ्यांनी अडवले. तर त्यांना स्वतःकडील लायसन्स दाखवावे लागते. वाहतूक पोलिसांकडून बऱ्याचवेळा लायसन्सची मूळ कॉपीच मागितली जाते. जर वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केले असेल, तर काही वेळा वाहतूक पोलिस त्याचे लायसन्स स्वतःकडेच ठेवून घेतात आणि दंड भरण्याची मागणी करतात. यावरून वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण आता लायसन्स किंवा गाडीच्या अन्य कागदपत्रांची मूळ प्रत जवळ ठेवण्याची गरज नाही.
वाहनचालक डिजिलॉकर किंवा एमपरिवहन अॅपवरही ही कागदपत्रे डाऊनलोड करून ठेवू शकतात आणि गरज पडेल, तेव्हा स्वतःकडील मोबाईलवरून ती वाहतूक पोलिसांना दाखवू शकतात. अशा पद्धतीने दाखवण्यात आलेली कागदपत्रेही वैधच आहेत, असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे जर या अॅपवर सर्व कागदपत्रे असतील, तर सोबत त्यांची मूळ प्रत बाळगण्याची गरज आता उरलेली नाही.
अॅप कसे काम करणार
डिजिलॉकर किंवा एमपरिवहन अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करा
आधार क्रमांकाच्या साह्याने त्याची नोंदणी करा
यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सच्या नंबरच्या साह्याने ते अॅपमध्ये डाऊनलोड करा
आपल्या मोबाईलवरील क्यूआर कोडच्या साह्याने तपास अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्या कागदपत्रांशी शहानिशा करतील
इ-चलनचा वापर
वाहतूक पोलिस त्यांच्याकडील इ-चलन अॅपच्या साह्याने तुमच्या मोबाईलमधील कागदपत्रांची शहानिशा करतील. जर तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. तुमची कोणतीही कागदपत्रे पोलिसांकडे जमा करावी लागणार नाहीत.