कोलकाता: पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या मृत्यूचे मोदी सरकारकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्या सोमवारी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सुकाणू समितीच्या (कोअर) बैठकीत बोलत होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, सरकारला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार, याची कल्पना होती. गुप्तचर यंत्रणांनी तसे संकेत दिले होते. मग केंद्र सरकाने आपल्या जवानांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने पावले का उचलली नाहीत, असा सवाल यावेळी ममता यांनी उपस्थित केला. मोदी सरकारने या जवानांचा बळी जाऊ दिला कारण निवडणुकांच्या तोंडावर त्यांना राजकारण करायचे होते, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.
सध्याचे सरकार चालवणाऱ्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांना युद्धजन्य वातावरण निर्माण करायचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा काळ हा देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट कालावधी होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे हुकूमशाही सरकार उलथवून टाकण्याची शपथही यावेळी ममता बॅनर्जी यांनी घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस सर्व ४२ जागांवर विजयी होईल, असा विश्वासही ममता यांनी व्यक्त केला.
१४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या ताफ्यातील गाडीवर नेऊन आदळले होते. यामध्ये ४० भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.