Chhattisgarh Crime:हल्लीच्या मुलांना मोबाईलच व्यसन लागलंय. कधीकाळी मैदानी खेळ खेळणारी मुलं आता तासनातास मोबाईलला खिळून असतात. त्यांना सांगायला गेलं तर राग नाकावर दिसू लागतो. पण हे वेळीच आवरलं नाही तर भविष्यात भयानक प्रकार समोर येऊ शकतात. याचीच प्रचिती एका घटनेतून आली आहे. छत्तीसगढच्या खैरागढ येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका 14 वर्षाच्या मुलीनं कथितरित्या आपल्या मोठ्या भावाची हत्या केलीय. बहिण सारखी मोबाईल वापरते म्हणून मोठा भाऊ ओरडला होता. याचा राग मनात धरुन अल्पवयीन बहिणीने कुऱ्हाडीने भावाचं आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे.
या घटनेत आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'मी आणि माझा 18 वर्षाचा भाऊ घरी होतो. परिवारातील इतर सदस्य बाहेर गेले होते. मी फोनवर मुलांशी बोलते असे म्हणत माझा भाऊ मला ओरडत राहायचा. तू फोनचा वापर करु नकोस असे सांगत राहायचा. याचा माझ्या मनात खूप राग होता. त्यानंतर माझा भाऊ झोपी गेला असताना मी कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर घाव घातला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
या घटनेनंतर मुलगी आंघोळीला गेली. तिने रक्ताने माखलेले कपडे धुतले. रक्ताचे डाग स्वच्छ केले. पण हळुहळू शेजाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीकडे यासंदर्भात चौकशी केली. तेव्हा मुलीने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.