भाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा

Maharashtra Assembly:  विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 19, 2024, 02:45 PM IST
भाजपच्या नेत्याने मला पैसे वाटपाची माहिती दिली, वसई राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा खळबळजनक दावा title=
विनोद तावडे

Maharashtra Assembly: विरारच्या एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला आहे. येथे भाजपकडून पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांनी केला. यावेळी भाजप - बविआ कार्यकर्ते भिडले. विनोद तावडेंना रंगेहाथ पकडलं. प्रविण दरेकर विनोद करतायत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या. भाजपला आता तोंड दाखवायला जागा नाही. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असेल तर तावडेंना अटक व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. ईव्हीएम मशिन वापरता, पैसे वाटप करता, दारु वाटप करता, काही नितिमत्ता राहिली नसल्याचे ते म्हणाले.  

पैसे वाटप आणि कार्यकर्त्यांची मिटींग कशी घेऊ शकतात? पोलीस आणि इलेक्शन कमिशन काही कारवाई करेल असेल वाटत नाही, अशी प्रतिक्रिया बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिली. तावडे 5 कोटी रुपये घेऊन येणार असे मला सांगण्यात आल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय. येथे काही डायरीदेखील सापडल्याचे ते म्हणाले. मला भाजपच्या वसई-नालासोपारा तालुक्याच्या नेत्याने मला माहिती दिली.  या घटनेनंतर विनोद तावडेंनी मला 25 वेळा फोन केला आणि माफी मागितली. हे प्रकरण जास्त ताणू नका, अशी विनंती तावडेंनी मला केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. 

भाजप सरचिटणीस विनोद तावडे कार्यकर्त्यांसह बैठक घेत असताना क्षितिज ठाकूर हॉटेल वर आले आणि गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी बविआ आणि भाजप च्या नेत्यांत वाद सुरू झाला. 

बविआने नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय. विनोद तावडे हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर असे आरोप करणे योग्य नाही. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे व्हिडीओ असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवावेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी झी 24 तासला दिली आहे.

राऊतांचा टोला

दरम्यान या राड्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय राऊतांनी यापैकी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. "भाजपचा खेळ खल्लास," असं म्हणत संजय राऊतांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या हॉटेलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन देताना संजय राऊतांनी, "जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो," असा टोला लगावला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बॅगा हॅलिपॅडवर तपासण्यात आल्याचा संदर्भ राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. दरम्यान, भाजपाचे हे सारे आरोप फेटाळले आहेत.