Chhattisgarh Crime : छत्तीसगडच्या (Chhattisgarh News) अंबिकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय नराधामाने पतीची हत्या करुन पत्नीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री घरात घुसून आरोपीने आधी पतीची हत्या केली. त्यानंतर पतीच्या मृतदेहासमोरच पत्नीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला आहे. पोलिसांनी (Chhattisgarh Police) घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासकार्य सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पती पत्नी झोपलेले असताना मध्यरात्री आरोपी दाम्पत्याच्या घरी पोहोचला होता. घरात घुसून आरोपी तरुण मृत व्यक्तीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगू लागला. यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. प्रकरण इतके वाढले की आरोपीने महिलेच्या नवऱ्याच्या डोक्यावर काठीने वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने पत्नीला धमकावून पतीच्या मृतदेहाशेजारीच तिच्यावर बलात्कार केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302, 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हाही मान्य केला आहे.
अंबिकापूरच्या मणिपूर तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. जशपूरचे रहिवासी असलेले 42 वर्षीय सुखलाल हे पत्नीसह बांधकाम सुरू असलेल्या झोपडीत राहत होते. सोमवारी रात्री सुखलाल आणि त्यांची पत्नी जेवण करून झोपले होते. दरम्यान, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरोपी कार्तिक कोरवा (21) हा सुखलाल यांच्या झोपडीत पोहोचला आणि त्याने सुखलाल आणि त्याच्या पत्नीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. आरोपी कार्तिकने सुखलालला सांगितले की, माझे तुझ्या पत्नीसोबत अवैध संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर कार्तिकने सुखलालवर काठीने जोरदार हल्ला करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी कार्तिकने सुखलाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्याच्या पत्नीला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, सुखलालच्या पत्नीने यासंदर्भात पोलीस तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून कार्तिकला अटक केली आणि त्याला तुरुंगात पाठवलं.