नवी दिल्ली : गुरुवारी रायसीना डायलॉग २०२० मद्ये बोलताना भारताचे पहिले चीफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांनी भारत - पाकिस्तान संबंधांबद्दल भाष्य केलंय. जनरल बिपीन रावत यांनी दहशतवादाविरोधात अद्याप लढाई संपलेली नाही. ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील. जेव्हापर्यंत दहशतवादाच्या मुळाशी आपण पोहचत नाही तेव्हापर्यंत नाईलाजानं आपल्याला यासोबत राहावं लागेल. दहशतवादाला संपवण्यासाठी आपल्याला अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल. अमेरिकेनं ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाला संपुष्टात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली होती.
जेव्हापर्यंत दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश आहे तेव्हापर्यंत आपल्याला या धोक्याचा सामना करतच राहावा लागेल. आपल्याला यावर निर्णायक रुपात दोन हात करावे लागतील. दहशतवादाविरुद्ध लढाई संपत आलीय, असा आपला कयास असेल तर आपण चूक आहोत. आंतरराष्ट्रीय युद्धात सहभागी होणाऱ्या आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशासोबत मैत्री होऊ शकत नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाला राजनैतिक स्तरावर धडा शिकवायला हवा. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाला जबाबदार धरायला हवं, असं बिपीन रावत यांनी म्हटलंय.
तालिबानबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, 'सर्वांसोबतच शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला हवेत परंतु केवळ दहशतवाद सोडावा लागेल या एकाच अटीवर... दहशतवादाला थारा देणाऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी. मला वाटतं की 'फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स' (FATF) द्वारे अशा देशांना ब्लॅकलिस्ट करणं हा सगळ्यात चांगला उपाय ठरेल'...
आज पाकिस्तानातही दहशतवादाला मिटवण्यासाठी कॅम्प चालवले जात आहेत. कारण पाकिस्तानला आता हे समजलंय की ज्या दहशतवादी संघटनांना त्यांनी पाळलंय त्याचा आज त्यांना नुकसान पोहचवत आहेत, असंही बिपीन रावत यांनी म्हटलं.