नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणात आरोपीला संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर संसदेत जोरदार गदारोळ झाला. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला. गोंधळाच्या परिस्थितीतच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत निवेदन सादर केलं. इतिहासात पहिल्यांदाच सीबीआय अधिकाऱ्यांना तपासापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. चिटफंड गैरव्यवहार प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा हात असल्याचा आरोपही राजनाथ सिंह यांनी यावेळी केला आहे.
कोलकात्यामध्ये रविवारी संध्याकाळपासून राजकीय नाट्य पाहायला मिळतं आहे. रविवारी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सीबीआयचे ५ अधिकारी चौकशी करायला गेले होते. चिटफंड प्रकरणी सीबीआय अधिकारी, पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करणार होते. मात्र कोलकाता पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना अडवलं आणि त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर कोलकाता पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी स्वतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दाखल झाल्या.
कोलकाता पोलीस आयुक्तांविरोधातील सीबीआयच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. पुरावे सादर करा मग कारवाई करु असं न्यायालयाने म्हटलं आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगाल पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ममता बॅनर्जी यांनी संविधान बचाव नावाने धरणं आंदोलन पुकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुडाचं राजकारण करत असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सांगण्यावरुन सीबीआयनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप, ममता बॅनर्जींनी केला. यामुळे पश्चिम बंगाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधला वाद आणखी चिघळला आहे.
दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरू झाली असल्याची देखील चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या प्रकरणी अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी राज्यपालांना केल्या आहेत. या अहवालानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यपाल त्रिपाठी यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पाचारण केलं आहे.