लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाच्या राजकीय वातावरणामध्ये बऱ्याच हालचाली पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये प्रत्येक पक्ष हा तितक्याच बळकटीने स्वत:चं वेगळेपण सिद्ध करत मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. काँग्रेसही त्याच पक्षांपैकी एक असून, नव्या जोमाने उत्तर प्रदेशात सोमवारपासून त्यांच्या शक्तीप्रदर्शनास सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागाची जबाबदारी आणि महासचिव पदाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रियांका गांधी वाड्रा या प्रथमच नव्या पदाचा कार्यभार स्वीकारत जनतेच्या भेटीला येणार आहेत.
महासचिव म्हणून पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असणाऱ्या प्रियांका यांना या दौऱ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही साथ लाभणार आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यात त्या उत्तर प्रदेशमधील एकूण ४२ मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान वाराणसी, फैजाबाद, आजमगड, गोरखपूर, बलिया, फूलपूर, जौनपूर याठिकाणी एकुण चाळीस बैठका त्या घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दौऱ्याचं औचित्य साधत काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ध्वनीमुद्रीत फीक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये खुद्द प्रियांका गांधी जनतेला आव्हान करत असून, त्यांच्याच साथीने एका नव्या राजकारणाची सुरुवात करण्याविषयी बोलत असल्याचं ऐकू येत आहे. जनतेशी जोडलं जाण्याचा त्यांचा हा मार्गही सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वसमावेशक राजकारणाची सुरुवात करण्याचा मानस असणाऱ्या प्रियांचा गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याकडे अनेक राजकीय नेतेमंडळी आणि तज्ज्ञांचंही लक्ष लागलेलं आहे. त्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे.
GS Incharge UP East, Priyanka Gandhi Vadra's message inviting the people of UP to join her as equal partners in a new kind of politics. #NayiUmeedNayaDeshhttps://t.co/u42l3JKBTQ
— Congress (@INCIndia) February 10, 2019
प्रियांका गांधी यांच्या याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोड शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधूनच जात असल्यामुळे याठिकाणी ८० पैकी अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून, आता त्यांची नवी राजकीय धोरणं पक्षाला किती फायद्याची ठरणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.