VIDEO: राहुल गांधींनी अखेर घर सोडलं, स्वत: दरवाजा बंद करत लावलं कुलूप; चेहऱ्यावर हसू ठेवत घेतला कर्मचाऱ्यांचा निरोप

Rahul Gandhi vacates Bunglow: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपलं सरकारी निवासस्थान अखेर सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपलं सर्व सामान आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी हलवलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2023, 06:57 PM IST
VIDEO: राहुल गांधींनी अखेर घर सोडलं, स्वत: दरवाजा बंद करत लावलं कुलूप; चेहऱ्यावर हसू ठेवत घेतला कर्मचाऱ्यांचा निरोप title=

Rahul Gandhi vacates Bungalow: लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपलं सरकारी निवासस्थान अखेर सोडलं आहे. राहुल गांधी 2005 पासून तुघलक लेनमधील सरकारी बंगल्यात वास्तव्य करत होते. सूरत कोर्टाने (Surat Court) अब्रुनुकसानीच्या खटल्यात त्यांनी दोषी ठरवल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. यानंतर राहुल गांधी यांना नियमाप्रमाणे आपलं सरकारी निवासस्थान सोडावं लागलं आहे, राहुल गांधी यांनी घऱ सोडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्य बोलण्यासाठी आपण कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. 
 
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये निवडणूक प्रचारसभेत सर्व चोरांचं आडनाव मोदी आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सूरत कोर्टात अब्रूनुकसानीचा खटला टाकण्यात आला होता. याप्रकरणी सूरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर त्यांना लगेच जामीनही मंजूर करण्यात आलं होतं. 

राहुल गांधी यांनी सूरत कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पण कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. यावरुन राहुल गांधी यांनी टीका करताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. 

"भारतातील लोकांनी 19 वर्षं मला या घरात वास्तव्य करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सत्य बोलण्याची ही किंमत आहे. पण सत्य बोलण्यासाठी मी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे," असं राहुल गांधी कारमधून निघून जाण्याआधी प्रसारमाध्यांशी बोलले.

राहुल गांधी यांनी यावेळी आपण आपलं सर्व सामान आई सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी हलवत असल्याची माहिती दिली. राहुल गांधी यापुढे तिथेच वास्तव्य करणार आहेत. दरम्यान राहुल गांधी घर सोडून जात असताना त्यांची बहिण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी त्यांच्या मदतीसाठी उपस्थित होत्या. 

दरम्यान घर सोडल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: दरवाजाला कुलूप लावत घराची चावी अधिकाऱ्याकडे सोपवली. दरम्यान यावेळी त्यांनी बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले. लोकसभा सचिवालयाने 27 मार्चला राहुल गांधी यांना बंगला सोडण्याची नोटीस पाठवली होती.

काँग्रेस आणि इतर पक्षांनी कोर्टाच्या निर्णयावर टीका केली असून हे राजकीय षडयंत्र तसंच लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने मात्र कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून काँग्रेस पक्ष न्यायालयाचा अवमान करत असल्याची टीका केली आहे.