नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून गुजरात विधानसभा निवडणुकीचा कल स्पष्ट झालाय. या निवडणुकीतही भाजपने आपला गड कायम राखलाय.
मात्र असे असले तरी गुजरातमधील काँग्रेसच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. काँग्रेसने भाजपच्या या गडात पुरेपूर जोर लावला होता. त्याचा थोडाबहुत फायदा त्यांना झालेला दिसतोय. निकालाचे सध्याचे कल पाहता गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने थोडीफार प्रगती केलीये.
गुजरातमध्ये जरी काँग्रेसने थोडी प्रगती केली असली तरी हिमाचल प्रदेशमधील सत्ता मात्र त्यांना गमवावी लागतेय. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील कल पाहता भाजपाने जोरदार मुसंडी मारलीये.
२०१२मधील निवडणुकीत काँग्रेसने ३२ जागांसह विजय मिळवला होता. मात्र यावेळी हिमाचलकडे लक्षच न दिल्याने कांग्रेसला याचा फटका बसला. हिमाचलमधील सत्ता काँग्रेसने गमावल्याचे दिसतेय.
त्यामुळे यंदाच्या या दोन्ही राज्यातील निवडणुकीचे चित्र पाहता काँग्रेसने गुजरातमध्ये जरी थोडं कमावलं असलं तरी हिमाचलमध्ये त्यांनी बरंच काही गमावलंय.