Corona And H3N2 update : कोरोना आणि H3N2 रूग्णवाढीचा उद्रेक झाल आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोना आणि H3N2 रूग्णवाढीमुळे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या तसेच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे (Corona And H3N2 update).
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. मुंबईत महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा लसीकरणावर भर दिला आहे. बूस्टर डोस घेतल्यास नव्या व्हेरियंटवर मात करता येईल असं तज्ज्ञांचं मत आहे. मुंबईत अनेकांना अजूनही बूस्टर डोस घेतलेला नाही. त्यामुळे आता अँटिबॉडिज कमी झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. जिनोम सिक्वेन्सिंगनुसार राज्यात 105 सँपल्स ही नव्या XBB 1.16 या व्हेरियंटचे आढळले आहेत. कोरोना विषाणूत सतत बदल होतायत. बूस्टरमुळे कोरोनाची तीव्रता कमी होते. त्यामुळे व्हेरियंटवर मात करणं शक्य आहे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात H3N2 आणि कोरोना रूग्ण कमालीचे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसंच राज्यातल्या सर्व रूग्णालयांना उपाययोजना करण्याचे तसंच रूग्णालयांना सतर्क राहण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणांना आढावा घेण्यासाठी देशातील सर्व रूग्णालयात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रील घेण्याचे आदेश देण्यात आलेत. देशात केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत. मॉक ड्रील कशा पद्धतीने असावं यासाठीच्या सूचना उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलं जाणार आहे.