कशी थोपवाल कोरोनाची तिसरी लाट? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

दुसऱ्या लाटेनंतर  तिसऱ्या लाटेचं संकट समोर आहे.

Updated: Jun 23, 2021, 09:24 AM IST
कशी थोपवाल कोरोनाची तिसरी लाट? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण तिसऱ्या लाटेचे संकट समोर आहे. पण तिसरी लाट थोपवणं शक्य आहे... असं सकारात्मक मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी व्यक्त केलं. मात्र त्यासाठी वेगाने लसीकरण, सुरक्षा कवचाचा वापर आणि गर्दी टाळली तर तिसरी लाट टाळता येईल असं पॉल यांनी म्हटलंय. 

कोरोना म्युटेशनमुळे तिसरी लाट अपरिहार्य असल्याचं राहुल गांधी यांनी काल म्हटल्यानंतर पाच तासांनी पॉल यांनी हे विधान केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत डॉ. पॉल यांनी तिसऱ्या लाटेला नियंत्रित करण्याची संभाव्य शक्यता मांडली.  खुल्या जागेत फिरायला जाऊ शकता, पण गर्दी जमवून समारंभ करू नका. विषाणूला संसर्गाची संधी देऊ नका असं ते म्हणाले. 

कोरोनाची तिसऱ्या लाटेला थोपवणं नागरिकांच्या हातात आहे. सर्वत्र अनलॉक करण्यात आहे. त्यामुळे नागरिक बेफिकीर होऊन रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे तिसरी लाट ६-८ आठवडय़ांत येण्याची भीती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान; राज्यात गेल्या 24 तासात 8 हजार 470 नव्या कोरोना रुग्णांची (Covid 19) नोंद झाली आहे. तर  एकूण 9 हजार 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रूग्ण संख्येत होणारी ही घट विक्रमी आहे.