'माझी चूक झाली, मला...', शबाना आझमी यांनी मंचावर सर्वांसमोर कान पकडून मागितली ज्योतिकाची माफी

नेटफ्लिक्स (Netflix) सीरीज डब्बा कार्टेलच्या (Dabba Cartel) ट्रेलर लाँचदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी आपली सह-अभिनेत्री ज्योतिका ची(Jyotika) माफी मागितली.   

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 04:19 PM IST
'माझी चूक झाली, मला...', शबाना आझमी यांनी मंचावर सर्वांसमोर कान पकडून मागितली ज्योतिकाची माफी title=

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांना आजही एक उत्तम चरित्र अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. त्यांनी मुख्य प्रवाहातीलही अनेक चित्रपट केले आहेत, ज्यासाठी समीक्षकांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. नुकतंच त्यांनी इंडस्ट्रीत झालेल्या बदलाचं श्रेय कास्टिंग डायरेक्टर्सना दिलं आहे. शबाना आझमी यांच्या मते कास्टिंग डायरेक्टर्सनी चित्रपटात ऑथेंटिक आणि डायव्हर्स चेहऱ्यांना संधी देत जुनी परंपरा संपवली आहे. नेटफ्लिक्सवरील (Netflix) आपली आगामी सीरीज डब्बा कार्टेलच्या (Dabba Cartel) ट्रेलर लाँचदरम्यान त्यांनी आपलं हे मत मांडलं आहे. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी जाहीरपणे अभिनेत्री ज्योतिकाची माफी मागत सर्वांना आश्चर्यचकित केलं. या सीरिजमध्ये ज्योतिकाही मुख्य भूमिकेत आहे. 

मुंबईत एका कार्यक्रमात डब्बा कार्टेलचा ट्रेलर लाँच करण्यात आला. मेहबूब स्टुडिओत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सीरिजमधील संपूर्ण कास्ट हजर होती. यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शबाना आझमी यांनी एका घटनेची कबुली दिली आणि सर्वांनाच धक्का बसला. ज्योतिकासहित दोन कलाकारांना सीरिजमधून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न केला असा खुलासा त्यावेळी त्यांनी केला. 

शबाना आझमी यांनी सांगितलं की, "मला एक कबुली द्यायची आहे. या शोमध्ये दोन अभिनेत्री आहेत ज्यांना मी हटवू इच्छित होते. यामधील एक ज्योतिका आहे. तिला याची कल्पना नाही. पण मी तिला खरंच बाहेर काढू इच्छित होती. तिच्याजागी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करावं अशी माझी इच्छा होती. मी त्यांना (फरहान आणि शिबानी) इथपर्यंत सांगितलं होतं की, दुसऱ्या कोणाला तरी घ्यावं". जेव्हा प्रसारमाध्यमांनी दिग्दर्शक हितेस भाटिया यांना सर्व कलाकारांना एकत्र आणण्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी ही गोष्ट मान्य केली. या सीरिजमध्ये गजराज राव, निमिषा सजयन, शालिनी पांडे. अंजली आनंद, सई ताम्हणकर, जिशू सेनगुप्ता, लिलेट दुबे आणि भूपेंद्र सिंह जादावत यांच्यासह अनेक कलाकार आहेत. 

दरम्यान शबाना आझमी यांनी आपले कान पकडून ज्योतिकाची माफी मागितली. यानंतर ज्योतिकानेही त्यांच्या पाया पडत आदर दाखवला. शबाना आझमी यांनी ज्योतिकाला न काढल्याबद्दल टीमचं कौतुक केलं आणि तिच्यावर शंका घेणं आपली चूक होती हे मान्य केलं. तसंच सर्वांसोबत काम करण्यास मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. 

मालिका कधी प्रदर्शित होणार?

डब्बा कार्टेलबद्दल सांगायचं झाल्यास ही मालिका डबा सेवा चालवणाऱ्या सर्वसामान्य महिलांची कथा आहे जी संपूर्ण मुंबईत गुपचूप ड्रग्ज पोहोचवते. ही थ्रिलर मालिका 28 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.