1 crore to pregnant female employee: खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना विविध सुट्ट्या देत असते. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपणाच्या ठराविक सुट्ट्या दिलेल्या असतात. पण गरोदरपणाच्या सुट्टीवर गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अन्याय करण्याचा गुन्हा अनेक कंपन्यांकडून केला जातो. अशाच एका प्रकरणात पीडित महिलेने कोर्टात धाव घेतली आणि कंपनीकडून तिला 1 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
यूकेमधील बर्मिंगहॅममधील कंपनीत हा प्रकार घडला. एका महिलेने गरोदरपणामुळे घरून काम करण्याची परवानगी कंपनीकडे मागितले. या कारणावरुन कंपनीने त्या महिला कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढून टाकले. तिच्या लाईन मॅनेजरने तिला 'जॅझ हँड' इमोजी म्हणजेच हसणारा इमोजी पाठवला. पण या प्रकारानंतर यूके एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलने महिलेस भरपाई म्हणून 93 हजार युरो म्हणजेच सुमारे 1 कोटी रुपये देण्यास सांगितले.
मिलुस्का ही रोमन प्रॉपर्टी ग्रुपमध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून सामील झाली आणि ऑक्टोबरमध्ये तिला तिच्या गरोदरपणाबद्दल कळले आणि त्यावेळी तिला मॉर्निंग सिकनेसचा त्रासदेखील होत होता. गरोदर असलेली मिलुस्का आजारी पडल्यानंतर तिने आपल्या टीम लीडर कबीरला यासंदर्भात 1 डिसेंबर 2022 रोजी मेसेज करुन माहिती दिली. पण तुझ्या अनुपस्थितीत प्रलंबित कामे पूर्ण होणार नाही, असे तिला सांगण्यात आले.
आजारपण वाढल्याने मिलुस्काने वर्क फ्रॉम होम मागितले. पण 1 डिसेंबरनंतर कबीरने मिलुस्काला मेसेज करुन तुला कामावरुन कमी करण्यात आल्याचे सांगितले. हा मेसेज पाहून मिलुस्का आश्चर्यचकीत झाली. तिने स्पष्टपणे तिची प्रतिक्रिया दिली. त्यात तिने लिहिले, 'काय चाललंय याबद्दल मी गोंधळली आहे. मला गरोदरपणाशी संबंधित समस्या येत आहेत पण तरीही मी ठरल्याप्रमाणे रिमोट वर्क करत होते. बरे वाटत नसतानाही मी काम करत होते पण तरीही मला काढून टाकले जात आहे.'
न्यायालयात कबीरने आपली बाजू मांडली. तिला 1 डिसेंबरपासून पगार देण्यात आला नव्हता. पण याचा अर्थ तिला कामावरुन काढले असा नसल्याचे कबीरने सांगितले. पण तिची नोकरी धोक्यात आहे,असाच याचा अर्थ होत असल्याचे न्यायालयाने सांगितले. गरोदर असल्या कारणाने तिला काढण्यात आले. त्यामुळे तिला भरपाई मिळायला हवी, असेही न्यायाधिशांनी पुढे म्हटले. हे प्रकरण सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. ज्यात नेटकरी मिलुस्काच्या मागे उभे दिसत आहेत.