चंदीगड : हरियाणाच्या कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रयत्नात करत असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 55 वर्षीय व्यक्ती पानीपतचा राहणारा आहे. त्याने रुग्णालयातून पळून जाण्य़ासाठी आपल्या पलंगला, पॉलिथिनच्या चादरी आणि त्याचा शर्ट बांधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण ६ व्या मजल्यावरुन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कोविड -१९ च्या संसर्गाच्या संशयामुळे त्याला रुग्णालयाच्या वेगळ्या वॉर्डात ठेवण्यात आले होते. करनालचे पोलीस निरीक्षक संजीव गौर यांनी सांगितले की, वेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेल्या संशयित रूग्णने सोमवारी पहाटे पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या व्यक्तीला रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धावताना पाहिले आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, "एका स्वतंत्र खोलीत या रुग्णाला ठेवण्यात आले होते आणि तो काय करीत आहे हे कोणालाही दिसले नाही." त्या व्यक्तीच्या प्राथमिक अहवालात कोरोना संक्रमणाची पुष्टी झाली नसल्याचे नोंदवले गेले. पण अंतिम तपास अहवाल येणे अजून बाकी आहे.