नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या (Covid19) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) यांनी आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. कोरोना साथीची सद्यस्थिती पाहता पंतप्रधान मोदी काही मोठ्या घोषणा करु शकतात असे म्हटलं जातंय. पंतप्रधान कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी सर्वंकष रणनीती राबविण्याची घोषणा करू शकतात. गेल्या एका दिवसात देशात 3,79,257 कोरोना केसेस नोंदवली गेली.
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्यासोबत एक बैठक घेतली. ज्यामध्ये कोविड मॅनेजमेंटमध्ये सैन्याने उचललेली पावले आणि अन्य तयारीचा आढावा घेतला. सैन्याने आपले वैद्यकीय कर्मचारी राज्य सरकारांच्या सेवेत तैनात केले आहेत. त्याचबरोबर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू केली जात असल्याचे या दरम्यान सैन्य प्रमुख नरवणे यांनी पंतप्रधानांना सांगितले.
कोरोना विरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्याने घेत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन सांगितले.
सैन्य दलाची तयारी आणि व्यवस्थापनासाठी घेतलेल्या पुढाकारांविषयी त्यांनी माहिती घेतली. सैन्यातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती रुग्णालये बांधली जात आहेत. आर्मी रुग्णालये शक्य असेल तेथे सर्वसामान्यांच्या सेवेत वापरली जात आहेत आणि यासाठी सामान्य नागरिकांना हवे असल्यास जवळच्या सैन्य रुग्णालयात संपर्क साधता येईल अशी माहिती लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना दिली. आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहने व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांच्या कौशल्यांची आवश्यकता असते, तेथे सैन्य दलाच्या जवानांकडून मदत पुरविली जात असल्याची माहिती नरवणे यांनी दिली.