नवी दिल्ली: पुलवामाचा हल्ला आम्ही कधी विसरणार नाही आणि सूत्रधारांना कदापि माफ करणार नाही, अशी गर्जना केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर शुक्रवारी सीआरपीएफकडून ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही. या कृत्याला कदापि माफी मिळणार नाही. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आमचा सलाम. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे राहू. या नृशंस कृत्याचा बदला घेतल्यावाचून आम्ही राहणार नाही, असा इशारा सीआरपीएफने दिला.
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी देश उभा असल्याचे म्हटले. तर नागरिकांकडून या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
WE WILL NOT FORGET, WE WILL NOT FORGIVE:We salute our martyrs of Pulwama attack and stand with the families of our martyr brothers. This heinous attack will be avenged. pic.twitter.com/jRqKCcW7u8
— CRPF (@crpfindia) February 15, 2019
याशिवाय, काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या हल्ल्याची कठोर शब्दांत निर्भत्सना केली. अशावेळी सर्व विरोधी पक्ष भारतीय जवान आणि सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.