मुंबई: अविश्वास ठरावादरम्यान संसदेत ताडाखेबंद भाषण ठोकल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांची उत्तरादाखल उडवलेली खिल्ली तसेच, देशभरातून भाजपच्या गोटातून होणारी टीका या सर्वांना राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून सातत्याने द्वेष, तिरस्कार आणि भीती पसरवली जाते. त्यांच्या या कृतीला प्रेम आणि आपुलकी असेच उत्तर असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. देश कधीही भीती, द्वेष आणि तिरस्काराने जोडला जात नाही. प्रेम आणि आपुलकीनेच जोडला जातो असेही राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अविश्वास ठरावावर सभागृहात झालेल्या मतदानादरम्यान एनडीएला ३२५ मते मिळाली. त्यामुळे भाजप सरकारविरोधातला अविश्वास ठराव संमत होऊ शकला नही. यावरही राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत करतो असे खिलाडूपणे म्हटले आहे. दरम्यान, आजच्या ट्विटमध्येही राहुल यांनी पुन्हा एकदा प्रेम आणि आपूलकीचीच भावाना व्यक्त केली आहे.
The point of yesterday’s debate in Parliament..
PM uses Hate, Fear and Anger in the hearts of some of our people to build his narrative.
We are going to prove that Love and Compassion in the hearts of all Indians, is the only way to build a nation.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 21, 2018
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. राहुल गांधी यांनी संसदेत त्यांच्या जागेवर जाऊन नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेण्याआधी राहुल गांधी यांनी आपल्यावर भाजपकडून होत असलेले आरोप सांगितले. दरम्यान, राहुल गांधी नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेण्याआधी म्हणाले, मला कुणी पप्पू म्हणा, शिव्या द्या, माझ्याबद्दल तुमच्या मनात तिरस्कार आहे, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल तसूभरही तिरस्कार नाही. एवढं सांगून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या जागेवर जाऊन नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली आणि सर्व खासदार अवा्क झाले.