नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अर्थात 'आप' यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी झाल्याचे दुपारी स्पष्ट झाले होते. मात्र, सायंकाळी उशिरा आलेल्या वृत्तानंतर काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा झाली. त्यानुसार प्रत्येकी ३ जागा आणि अपक्ष उमेदवाराला एक जागा, असे ७ जागांचे वाटपही ठरले होते. मात्र, दिल्ली काँग्रेस बैठकीत माशी शिंकल्याचे दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांनी स्पष्ट केले, दिल्लीत 'आप'सोबत काँग्रेसची युती होणार नाही, असा निर्णय बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने भाजपसोबत छुपी आघाडी केल्याचे बोलले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. भाजपविरोधी मतांची विभागणी करून काँग्रेस भाजपला मदत करत असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हातमिळवणी करणार असल्याची शक्यता काँग्रेसने फेटाळून लावल्यानंतर आता दिल्लीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. दिल्लीत 'आप'चे सरकार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धूळ 'आप'ने चारली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि 'आप'च्या युतीमुळे भाजपला मोठा फटका लोकसभेत बसला असता पण आता मतविभागणीचा फायदा कोणाला होणार हे लोकसभा निवडणूक निकालनंतर स्पष्ट होणार आहे.
At a time when the whole country wants to defeat Modi- Shah duo, Cong is helping BJP by splitting anti-BJP vote. Rumours r that Cong has some secret understanding wid BJP. Delhi is ready to fight against Cong-BJP alliance. People will defeat this unholy alliance. https://t.co/JUsYMjxCxy
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 5, 2019
राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिल्लीत लोकसभेसाठी 'आप' आणि काँग्रेस ३-३ जागा विभागून घेण्याचे निश्चित केले होते. तर १ जागा अपक्षाला सोडणार अशा चर्चा होती. मंगळवारी दुपारी राहुल गांधी यांनी या युतीसंदर्भात दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि शीला दीक्षित या बैठकीस उपस्थित होत्या. दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांचा मतांचा आढावा घेऊन राहुल यांनी या आघाडीचा निर्णय रद्द केला. त्यानंतर 'आप'सोबत होणारी आघाडी रद्द करण्यात आली. त्यामुळे केजरीवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे हे पाऊल भाजपला मदत करणारे आहे, अशी जोरदार टीका केली.
दरम्यान, केजरीवाल यांनी लोकसभेसाठी आपेल सातही उमेदवार जाहीर केले होते. त्यांची नावेही जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले. त्यावेळी केजरीवाल यांनी एक पाऊल मागे घेत तीन जागा सोडण्याची तयारी दाखवली तर एक जागा अपक्ष उमेदवार आणि 'आप' तीन जागा लढविणार, असे ठरले. मात्र, काँग्रेसने मतांची वाढ झाल्याचे लक्षात घेऊन 'आप'सोबतबरोबर होणारी आघीडी रद्द केली. दरम्यान, 'काँग्रेसने भाजपसोबत छुपी आघाडी केल्याच्या अफवा आहेत. दिल्ली भाजप-काँग्रेस युतीशी लढण्यास तयार आहे. अशा अनैतिक युतीला जनता हरवेल,' असं ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.