११ वह्या-११ वर्ष-११ मृत्यू, दिल्लीच्या धक्कादायक घटनेचा गुंता सुटला

दिल्लीच्या बुराडी भागामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. 

Updated: Jul 5, 2018, 01:45 AM IST
११ वह्या-११ वर्ष-११ मृत्यू, दिल्लीच्या धक्कादायक घटनेचा गुंता सुटला  title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या बुराडी भागामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा गुंता सोडवल्याचा दावा क्राईम ब्रांचनं केला आहे. पोलिसांना या घरातून ११ वह्या मिळाल्या आहेत. यामध्ये मृत्यूची पूर्ण स्क्रिप्ट लिहिण्यात आली आहे. ११ वर्षांपूर्वी या कहाणीला सुरुवात झाली होती. २००७ साली या परिवाराचे मुख्य सदस्य भोपाल सिंग यांचा मृत्यू झाला होता. भोपाल सिंग आत्मा बनून आपल्या शरिरात येत असल्याची बतावणी त्यांचा छोटा मुलगा ललित करत होता. आत्मा आल्याचं भासवून ललित अनेक वेळा घरच्यांशी बोलायचा. यावेळी तो वडिलांचाच आवाज काढायचा. वडिलांच्याच आवाजत ललित घरच्यांनी कोणत्याही गोष्टीचा काय निर्णय घ्यायचा ते सांगायचा.

कुटुंबाचा विश्वास बसला

ललितच्या शरिरात भोपाल सिंग यांचा आत्मा येण्यावर या कुटुंबाचाही विश्वास बसला. ललितच्या शरिरात वडिलांचा आत्मा आल्यामुळेच मागच्या ११ वर्षांपासून आपली प्रगती झाली. एका दुकानाची ३ दुकानं झाली. आता दुसऱ्या घराचंही काम सुरु आहे, अशी धारणा या कुटुंबाची झाली.

ललितच्या बहिणीला मंगळ

ललितची बहिण प्रियांकाला मंगळ असल्यामुळे तिचं लग्न होत नव्हतं. वडिलांच्या सांगण्यावरून एक खास पूजा केल्यानंतर १७ जूनला प्रियांकाचं लग्न ठरलं आणि तिचा साखरपुडाही झाला. चांगल्या मुलाशी प्रियांकाचं लग्न ठरल्यामुळे कुटुंबही खुश होतं. पण ललितनं पुन्हा एकदा शरिरात वडिलांचा आत्मा आल्याचं भासवलं आणि २४ जूनपासून ७ दिवस चालणारी मोठी पूजा म्हणजेच वडाची तपश्चर्या करायला सांगितलं. वडाची पूजा केल्यामुळे आपल्याला आणखी चांगले दिवस येतील, असं ललितनं वडिलांच्या आवाजात कुटुंबाला सांगितलं.

यानंतर २४ जूनपासून कुटुंब रोज पूजा करत होतं. ३० तारखेला रात्री १२ ते १ मध्ये सगळ्यांना वडाच्या झाडांच्या पारंब्यांप्रमाणे उभं राहायचं आहे. तसंच कोणाला कुठे उभं राहायचं आहे याची सगळी माहिती पोलिसांना सापडलेल्या वहीमध्ये लिहिली होती.

३० जूनच्या रात्रीची घटना सीसीटीव्हीत कैद

१० वाजता नीतू आणि तिची आई काळ्या रंगाचं स्टूल घेऊन वरती गेले 

१०.४० मिनिटांनी डिलीवरी बॉय जेवण घेऊन आला. प्रियांकानं हे जेवण घेतलं

१०.५७ भूपी कुत्र्याला फिरवायला बाहेर घेऊन गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी

५.५६ मिनिटांनी ट्रक दूध घेऊन आला. रोज ६ वाजता उघडणारं दुकान बंद असल्यामुळे ट्रक वाल्यानं अनेकवेळा फोन केला पण कोणीच फोन उचलला नाही.

६.०३ मिनिटांनी ट्रक निघून गेला

७.१४ नोकरांनी शेजारच्या सरदारला सांगितलं, तो वरती गेला आणि ३५ सेकंदात खाली येऊन आरडाओरडा करायला लागला.

या कुटुंबाला आत्महत्या करायची नव्हती असं या वह्यांमधून स्पष्ट होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आपल्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी ही तपश्चर्या करायचं ठरवलं. पण यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वडाच्या झाडाची पूजा करून कुटूंब सुखी राहण्यासाठी ७ दिवस या घरात पूजा सुरू होती. पण आत्म्याला खुश करण्याच्या नादात ११ जणांना जीव गमवावा लागला.

या कुटुंबातल्या १० जणांचे मृतदेह वडाच्या पारंब्यांप्रमाणे लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळले. या सगळ्यांच्या डोळ्यांना आणि तोंडाला पट्टी बांधण्यात आली होती. तर घरातल्या वृद्ध महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला होता. 

बुराड़ी

बुराड़ी केस