कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे 'डिमो-डिजॉस्टर' (मोठा अपघात) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
नोटबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर नोटबंदीने काय साधले याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. विरोधकांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, सरकारने नोटबंदीच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. या पार्श्वभूमिवर पंश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. नोटबंदीचा निशेष म्हणून ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर अकांऊंटवर काळ्या रंगाचा डिस्पे पोस्ट केला आहे. नोटबंदीच्या विरोधात आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आपण काळा डिस्प्ले वापरू असे ममता यांनी सोमवारीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे ममता यांनी आज काळा डिस्प्ले वापरला.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, नोटबंदी हा मोठा घोटाळा होता. ज्याचा हेतू काळा पैसा पांढरा करणे हा होता. ममता बॅनर्जी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, सत्ताधारी पक्षांच्या खासगी फायद्यासाठी अर्थातच काळा पैसा पांढरा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
नोटबंदीच्या निर्णयाचा विदेशातील काळा पैसा भारतात येण्यासाठी काहीच फायदा झाला नाही. नोटबंदीमुळे ना दहशदवाद्यांवर परिणाम झाला, ना देशाच्या विकासात काही योगदान मिळाले. पण, नोटबंदीमुळे देश आपले तब्बल तीन लाख कोटी रूपयांचे Gross domestic product मात्र गमावले, असा हल्ला ममतांनी चढवला आहे.