मुंबई: गाढवाच्या मांसामध्ये असणाऱ्या कथित औषधी गुणधर्मांमुळे अलीकडच्या काळात देशभरात या प्राण्यांच्या कत्तलीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातून गाढवांची प्रजाती नामशेष होईल की काय, असा धोकाच उभा ठाकलाय. या पार्श्वभूमीवर सरकारकडून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने गाढवांची कत्तल होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.
राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून अशा आशयाचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. गाढवांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर गाढवं नामशेष होतील, अशी भीती राज्य सरकारला वाटत आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यानंतर देशभरातील सर्वच राज्यांना दक्षता घेण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. राज्यातील संबंधित विभागानेही याची दखल घेतली आहे.
गाढवांची संख्या कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र, यापैकी प्रमुख कारण म्हणजे गाढवाच्या मांसात असणारे औषधी गुणधर्म. याशिवाय, गाढवांचे अवयव आणि रक्ताचा वापर अवैधरित्या पशूखाद्यांमध्ये पूरक म्हणून वापर करण्यात येतो. चीनमध्ये गाढवांचे मांस तब्येतीसाठी चांगलं असल्याचेही मानतात. त्यामुळे अवैधरित्या गाढवं चीनला निर्यात केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
गाढवांची कातडी आणि रक्त चिनी लोक कर्करोग आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरतात. त्यामुळे भारतामध्ये अनेक ठिकाणी गाढवाच्या मांसाचे सेवन करण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
गाढव हा मेहनती आणि मालवाहतूक करणारा प्राणी आहे. कुंभाराच्या प्रत्येक दाराला एक गाढव हे आपण लहानपणापासून पाहत आलोय. मात्र हीच गाढवं आता नामशेष होण्याची भीती आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेतली नाही तर 'एक होतं गाढव' अशी म्हणण्याची वेळ येऊ शकते.