The Diary of West Bengal: 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) चित्रपट पूर्ण होऊन आता महिना होत आला तरी चित्रपटावरून सुरु असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीए. त्यातच आता आणखी एका चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' (The Diary of West Bengal) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला असून यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या चित्रपटावरुन पश्चिम बंगालमधलं (West Bengal) ममता सरकार (CM Mamata Banerjee) चांगलंच संतापलं असून चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगाल पोलिसांनी (West Bengal Police) नोटीस जारी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पश्चिम बंगाल राज्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरवरुन वाद
'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटात हिंदूवर झालेला अन्याय दाखवण्यात आला आहे. जिंतेंद्र त्यागी उर्फ वसीम रिझवी दिग्दर्शित 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' हा चित्रपट पश्चिम बंगालमधली परिस्थिती आणि तिथल्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात सुरुवातीलाच एक वाक्य आहे. यात म्हटलंय 'जनतेने निवडून दिलेले लोकशाही सरकार. पण याचा अर्थ असाही होतो, जर बहुसंख्य मुस्लिम असतील तर कायदाही शरियतचाच असेल'.
त्यानंतर ममता बॅनर्जी यांची भूमिका साकारणारी एक महिला दिसते जी CAA आणि NRC वर बोलताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये पश्चिम बंगालमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याची झलक दाखवण्यात आली आहे. लोकांचं पलायन दाखवण्यात आलं आहे. याशिवाय बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना रोहिंग्या मुस्लिमांचं मोठ्या संख्येने पश्चिम बंगालमध्ये पुनर्वसन केलं जात असल्याचं या ट्रेलमध्ये दाखवण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालमधील परिस्थिती काश्मिरपेक्षाही बिकट होत चालली आहे, आसाममधल्या हिंदूंसाठी पश्चिम बंगाल हे दुसरं काश्मिर बनलं आहे. एकूणच या चित्रपटाच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात असल्याचं दर्शवण्यात आलं आहे.
सत्य दाखवण्याचा प्रयत्न?
द डायरी ऑफ वेस्ट बंगालचे निर्देशक सनोद मिश्रा यांनी पश्चिम बंगाल पोलिसांनी पाठवलेल्या नोटीशीवर नाराजी व्यक्त केली. आमचा उद्देश पश्चिम बंगालची बदनामी करण्याचा नाही तर केवळ तिथली सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न आहे असं सनोद मिश्रा यांनी म्हटलं. सत्य घटनांवर आधारीत हा चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलंय.
After a failed attempt to ban The Kerala Story (the film is still not in theatres because owners are being threatened with punitive action, if they do), Mamata Banerjee’s administration is now intimidating the director and producer of The Diary of West Bengal, a movie based on… https://t.co/Z4O5uHAOWX pic.twitter.com/seq0QL6VR1
— Amit Malviya (@amitmalviya) May 26, 2023
भाजपने साधला निशाणा
'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नोटीस पाठवल्यात आल्याने भाजपने ममता सरकारवर हल्लाबोल केला आहे. द केरळ स्टोरीवर बंदी आणण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर आता ममता सरकार 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चित्रपटाच्या दिग्दर्शकांना घाबरवत असल्याचं भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हटलं आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली परिस्थिती तथ्यहिन नाही, बंगालमधली जीवंत परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणं बंद केलं पाहिजे असं मालविय यांनी म्हटलंय.