G20 Summit Delhi 2023 : जी 20 परिषदेसाठी (G20 Summit) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे त्यांच्या विशेष विमानाने दिल्लीत (Delhi) आले आहेत. कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला जगातील सर्वोच्च सुरक्षा दिली जाते. त्यामुळे त्यांच्या भारत दौऱ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. बायडेन (Joe Biden Security) यांच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र आता बायडेन यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचे समोर आलं आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या जी-20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जो बायडेन यांच्या सुरक्षेत कथितपणे मोठी त्रुटी दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. बायडेन यांच्या ताफ्यात असलेली एक गाडी शनिवारी सकाळी प्रवाशांना दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊन जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडली आहे. या गाडीवर हॉटेल आणि प्रगती मैदानात प्रवेश करण्यासंबंधीचे पास होते. त्यामुळे बायडेन यांच्या ताफ्यातील कार दुसऱ्या प्रवाशांसाठी कशी वापरली गेली असा सवाल निर्माण होत आहे.घटनेची माहिती मिळताच विविध सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. या कारचा मार्ग हा फक्त आयटीसी मौर्य हॉटेलपासून प्रगती मैदानाकडे जाण्याचा होता. मात्र त्यापूर्वीच चालकाने या कारचा वापर इतर प्रवाशांना आणण्यासाठी केला आहे.
जो बायडेन हे नवी दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये थांबले आहेत. शनिवारी हॉटेलमधून प्रगती मैदानावरील कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी बायडेन यांच्या ताफ्यात सुमारे 60 वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. यातील काही गाड्या या अमेरिकेतून आणल्या आहेत. तर काही गाड्या भारतातून देण्यात आल्या आहेत. यातील काही वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत. यामध्ये हरियाणा क्रमांक असलेली एर्टिगा कार देखील समाविष्ट आहे. ही गाडी बायडेन यांच्या ताफ्याच्या पुढे चालणार होती.
नेमकं काय घडलं?
लाईव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, शनिवारी जो बायडेन यांचा ताफा सकाळी आठच्या सुमारास हॉटेलमधून निघणार होता. मात्र त्यापूर्वीच एर्टिगा कारचा चालक राधेश्याम याला त्याच्या नेहमीच्या प्रवाशाने फोन केला आणि बोलवून घेतले. त्याला हॉटेल ताज मान सिंग येथे जायचे होते, म्हणून राधेश्यामने लोधी इस्टेटमधून त्या प्रवाशाला गाडीत बसवले आणि हॉटेलमध्ये नेले. या गाडीवर खास सिक्युरिटी पास होते, त्यामुळे त्याला कुठेही थांबवण्यात आले नाही. मात्र हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले. युएईचे राष्ट्रपती याच हॉटेलमध्ये थांबले आहेत त्यामुळे इथेही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने हॉटेलवरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांना दिली.. त्यांनी राधेश्यामला ताब्यात घेतले. त्याची तसेच प्रवाशांची वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी अनेक तास चौकशी केली. राधेश्यामने त्या प्रवाशाला हॉटेलमध्ये सोडण्यासाठी गाडी नेल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे बायडेन यांच्या ताफ्यातून राधेश्यामची कार हटवून तिथे दुसरी गाडी नेमण्यात आली आहे.