मुंबई : Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. गोवा छोटे राज्य असल्याने अनेक राजकीय पक्षांना गोव्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी गोव्यात आघाडीची चाचपणी सुरु आहे. मात्र, काँग्रेसने आघाडीसाठी हात पुढे केलेला नाही. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीसाठी अनुकल आहेत. महाराष्ट्रात जो प्रयोग केला तो गोव्यात करण्याचा विचार आहे. येथे शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेशी जुळवून घेण्यास तयार नाही. त्यानंतर शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात शिवसेना झोळी घेऊन उभी नाही, असे रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. (Goa Election - Sanjay Raut slammed Congress)
आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही, त्यांच्या खिशातल्या जागा मागितलेल्या नाहीत, असे सांगत संजय राऊत यांनी काँग्रेला प्रत्युत्तर दिलेय. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एकत्र लढण्याच्या विचाराला धक्का दिला आहे. गोव्यात महाविकास आघाडीचीप्रमाणे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत येणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यावरुन गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोग होणार नसल्याचे दिसून आले आहे. गोव्यात आघाडी करण्यास काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपाला धूळ चारु शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
दरम्यान, महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच गोव्यात शिवसेनेने आपले डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावे, असा टोला लगावला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर त्याच भाषेत दिले आहे. शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरुन उरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत बोलत होते.