नवी दिल्ली : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. त्याआधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीये. विशेष म्हणजे मोदी सरकारकडून सराफा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात आल्यानंतरही सोन्या-चांदीचे दर वाढलेत.
सोन्या-चांदीच्या खरेदीवरील नियमांमध्ये सूट दिल्यानंतर सोमवारी सराफा बाजारात सोन्याचे दर ७० रुपयांनी वाढत ते ३०,६२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. आतापर्यंत ५० हजार रुपयांच्या दागिने खरेदीवर पॅनकार्ड देणे बंधनकारक होते. आता ही मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवण्यात आलीये.
सोन्यासह चांदीच्या दरातही आज वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १०० रुपयांची वाढ होत ते प्रति किलो ४०,७०० रुपयांवर पोहोचले.
जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोने ०.३८ टक्क्यांनी वाढत १,२८२.२० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे ३०,६२० रुपये आणि ३०,४७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. सोन्यासह चांदीचे दरही १०० रुपयांनी वाढत ४०,७०० रुपयांवर बंद झाले.
गेल्याच आठवड्यात मोदी सरकारने सराफा व्यापारांना दिवाळीआधीच खुशखबर दिली होती. केंद्रानं सराफा व्यापाऱ्यांना 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'मधून बाहेर केलं.
सरकारनं केवायसी नियमांत बदल केले. या नव्या नियमांनुसार, ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंत दागिने खरेदीवर पॅन क्रमांक द्यावा लागणार नाही. आत्तापर्यंत ही मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत होती. त्यामुळे तुम्ही आता २ लाख रुपयांपर्यंत दागिने खरेदी केलेत तर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक देणं गरजेचं नसेल.
याशिवाय मोदी सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना काही अटींसहीत रिटर्न फाईल करण्यात सूट दिलीय. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील जवळपास ५ करोड छोट्या व्यापाऱ्यांना होऊ शकेल. नव्या नियमानुसार, वार्षिक १.३ करोडचा टर्नओव्हर करणाऱ्या व्यापाऱ्यांना महिन्याऐवजी तीन महिन्यांनी रिटर्न फाईल करण्याची सूट मिळणार आहे. तसंच निर्यातकांनाही मार्च २०१८ पर्यंत जीएसटीमध्ये सूट देण्यात आलीय.