Diwali Bonus : दिवाळी म्हटलं की काही गोष्टी आपोआपच लक्षात येतात. सणवार, उत्साह, भेटीगाठी यांसोबतच सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा आणि तितकाच खास असणारा हा घटक म्हणजे दिवाळी बोनस. प्रत्येक क्षेत्रानुसार दिवाळी बोनसची रक्कम ही विविध स्वरुपात कर्मचाऱ्यांना दिली जाते. यंदाची दिवाळी भारतातील नोकरदार वर्गासाठी खास असणार आहे, कारण 2024 च्या निवडणुकांपूर्वी देशातील नागरिकांच्या आनंदालाच केंद्र सरकार केंद्रस्थानी ठेवताना दिसत आहे.
विविध कारणांनी सरकार नागरिकांना बंपर गिफ्ट देण्याच्या तयारी असून, येत्या काळात काही योजनांमधून मिळणाऱ्या आर्थिक नफ्यातही सरकारकडून बदल केले जाणार आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणं, केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA वाढवून देणं, बोनस देऊ करणं अशा घोषणा केंद्राकडून केल्या जाऊ शकतात.
वरील मुद्दे बऱ्याच काळापासून विचाराधीन होते. परिणामी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडाळाच्या बैठकीत याबाबतचे निर्णय झाले असून, दिवाळीच्याच पार्श्वभूमीवर या निर्णांवर शिक्कामोर्तब होण्यास इतका वेळ गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात वाढीव रक्कम जाण्याची शक्यता आहे. देशातील इतर क्षेत्रांमधील कर्मचाऱी वर्गाच्या दृष्टीनंही केंद्र काही मोठे निर्णय घेऊ शकतं.
येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. या भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार असून, हा भत्ता 42 टक्क्यांवरून आता 45 टक्के केला जाणार आहे. 1 जुलै 2023 पासूनचा भत्ता कर्मचाऱ्यांच्या पगारात जोडला जाणार आहे.
इतकंच नव्हे, तर केंद्राकडून देशातील 10 कोटींहून अधिक भाडेकरूंसाठी आवास निधी योजना सुरु करण्यात येणार आहे. तर महिलांसाठीसुद्धा येत्या काळात सरकार काही आकर्षक योजना सुरु करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तिथं मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये दिवाळीच्या दिवसांदरम्यान निवडणुकांचाही माहोल असणार आहे, त्यामुळं नागरिकांसाठी इथंही काही मोठे आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.