मुंबई : जीएसटीसारखं विधेयक आणून व्यापाऱ्यांना गुंतवणूक करण्याचं जे वातावरण होतं, ते उध्वस्त झालं आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग काळजीत आहे, त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मूळ निर्णयाचे सूत्रच जर चुकीचं असेल तर, त्यातून यश कधी मिळत नसतं. GSTचं सूत्र आहे, ते सुलभ करण्याऐवजी भिक नको, पण कुत्रं आवर तशा प्रकारचं असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान 2 वर्षांत आपण महामंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडू, असा आशावादही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
जीएसटीमुळे अनेक उद्योग धंद्यांवर परिणाम झाला आहे, रेस्टॉरंटमधील जेवणावरही मोठ्या प्रमाणात जीएसटी लावला गेल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
सॅनेटरी नॅपकीनवर जीएसटी लावू नये, अशी मागणी महिला वर्गाने केली होती, मात्र त्यावरही अजूनही ठोस असा निर्णय झालेला नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने जीएसटीविषयीचा राग दिसून येणार असल्याचं म्हटलं जातं.