Crime News : सावत्र पित्याने शुल्लक कारणावरुन अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातच्या (Gujarat Crime News) राजकोटमध्ये समोर आलाय. हत्येनंतर आरोपी पित्याने मुलीला छातीला कवटाळून नेत तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला. यानंतर आरोपीने स्वतःच मुलगी बेपत्ता झाल्याचा बनाव रचला होता. मात्र सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे तपास करत पोलिसांनी क्रूर पित्याला अटक केली आहे. या प्रकरणी राजकोट, वडोदरा, गांधीनगर आणि मेहसाणा गुन्हे शाखेने एकत्र तपास करत ओरीपाला रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले.
पत्नीसोबत मुलीचा शोध घेण्याचा बनाव
आरोपी वडिलांनी पत्नीसह गेल्या आठवड्यात रात्री पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी गोंडल चौकासमोरील झुडपात मुलीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र पोलिसांनी तपास केला असता या हत्येमागे मुलीचा सावत्र पिता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र त्याआधीच आरोपीने पळ काढला होता. ट्रेनने उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला गुन्हे शाखेने मेहसाणा रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले.
का केली हत्या?
अमित गौर असे आरोपीचे नाव असून हत्या झालेली त्याची सावत्र मुलगी होती. "गेल्या शुक्रवारी दुपारी मुलगी आईकडे जाण्याचा हट्ट करत होती. मी यासाठी नकार देताच ती रडू लागली. तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने रडणे थांबवले नाही. याच गोष्टीचा राग आल्याने मुलीचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर तिची गळा आवळून हत्या केली," असे अमितने पोलिसांना चौकशीत सांगितले. हा सर्व प्रकार घडला तेव्हा मुलीची आई एका कारखान्यात कामाला गेली होती.
अडीच वर्षाच्या मुलीच्या हत्येनंतर अमितने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. मुलीला घेऊन तो घराबाहेर पडला तेव्हा शेजारच्यांनी मुलीबाबत चौकशी केली. यावेळी मुलगी आजारी आहे त्यामुळे तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन जात आहे, असे अमितने सांगितले. त्यानंतर आरोपी अमितने मुलीचा मृतदेह झुडपामध्ये फेकून दिला. यानंतर तो घरी परतला. जेव्हा संध्याकाळी मुलीची आई घरी परतली तेव्हा तिने मुलीला शोधण्यास सुरुवात केली. यावेळी पतीने मुलगी बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी सांगून महिलेसह शोध सुरू केला. यानंतर पोलिसांत जाऊन तक्रार देखील दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.