नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात अशाही पाच जागांवर मतदान झालं ज्या जिंकल्याशिवाय गुजरातची सत्ता मिळणं कठीण आहे. गेल्या ५५ वर्षांचा इतिहास आहे की, गुजरातमधील या पाच जागा जिंकणारा पक्षच गुजरातमध्ये सत्तेत आला आहे.
गुजरातमधील अंकलेश्वर, सूरत पूर्व, सूरत पश्चिम, ओलपाड आणि नवसारी या जागांवर विजय मिळवणारा पक्षच सत्तेत येतो. हे पाचही विधानसभा मतदारसंघ एकमेकांच्या जवळच आहेत.
अंकलेश्वर मतदारसंघ सूरतच्या शेजारील जिल्हा भरुचमध्ये आहे. ओलपाड, सूरत पूर्व आणि सूरत पश्चिम हे मतदारसंघ सूरत जिल्ह्यात येतात. नवसारी विधानसभा मतदारसंघ नवसारी जिल्ह्यात येतो. या सर्व मतदारसंघांत १९६२ ते २०१२ पर्यंत ज्या पक्षांनी विजय मिळवला आहे त्याच पक्षाची राज्यात सत्ता आली आहे.
१९६२मध्ये अंकलेश्वर, ओलपाड, सूरत पूर्व, सूरत पश्चिम आणि नवसारी मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यावेळी जीवराज नारायण यांच्या नेत्रृत्वात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर १९६७, १९७२, १९८० आणि १९८५ मध्येही काँग्रेसनेच विजय मिळवत सत्ता स्थापन केली.
१९९०च्या विधानसभा निवडणुकीत अंकलेश्वर, ओलपाड, सूरत पूर्व, सूरत पश्चिम आणि नवसारी मतदारसंघात भाजपने बाजी मारली. त्यानंतर १९९५, १९९८, २००७, २०१२ मध्ये या जागांवर भाजपने विजय मिळवत आपली सत्ता स्थापन केली.
५५ वर्षांच्या इतिहासात दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत ज्यावेळी या पाच जागांपैकी एक जागा पराभूत झाल्यानंतरही तो पक्ष सत्तेत आला आहे.
१९७५ साली काँग्रेस पक्षाचा सूरत पूर्व मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र, तरिही काँग्रेसने सत्ता स्थापन केली. तर, २००२ मध्ये सूरत पूर्व मतदारसंघातून भाजपचा पराभव झाला होता. मात्र, तरिही भाजपने सरकार स्थापन केलं.