Gujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra modi ) यांच्या गुजरातमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार असून 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि ‘आप’प्रमाणेच काही प्रादेशिक पक्षही स्वतःचं भवितव्य आजमावत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि आणि अल्पेश ठाकोर यांच्या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल.
दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गांधीनगर, मेहसाणा, पाटण, बनासकांठा, साबरकांठा, अरवली, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, आनंद, खेडा आणि छोटा उदयपूर जिल्ह्यातील 93 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात घाटलोडिया, विरमगाम आणि गांधीनगर दक्षिण या जागा सर्वाधिक चर्चेत आहेत.
याआधी 1 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते आणि सुमारे 63.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत आणि 1 डिसेंबर रोजी सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 जागांसाठी मतदान झाले.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाने (भाजप) 14 जिल्ह्यांतील या 93 जागांपैकी 51 जागा जिंकल्या होत्या, तर कॉंग्रेसने 39 जागा जिंकल्या होत्या आणि अपक्ष उमेदवारांनी 3 जागा जिंकल्या होत्या.
अहमदाबादच्या राणीपमध्ये पंतप्रधान मोदी मतदान करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींनी रविवारी (4 डिसेंबर) गांधीनगरमध्ये आई हिराबा यांचा आशीर्वाद घेतला.
गुजरात निवडणुकीबाबत पीएम मोदींनी ट्विट केले आहे की, 'मी सर्व नागरिकांना, विशेषत: तरुण आणि महिला मतदारांना गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान करण्याची विनंती करतो. मी अहमदाबादमध्ये सकाळी 9 वाजता मतदान करणार आहे.
Urging all those who are voting in Phase 2 of the Gujarat elections, particularly the young voters and women voters to vote in large numbers. I will be casting my vote in Ahmedabad at around 9 AM.
— Narendra Modi (@narendramodi) December 5, 2022
यासोबतच त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भारताच्या विविध भागात पोटनिवडणुकाही होत आहेत. या जागांवर येणाऱ्या लोकांना मी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन करतो.'' दरम्यान दोन टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.