अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलेय. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने भाजपसमोर त्यांच्याच गडात आव्हान दिलेय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांची प्रतिष्ठापणाला लागलेय. त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाही कस लागणार आहे.
भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. या टप्प्यात ९३ जागांसाठी ८५१ मतदार रिंगणात असून भाजपसमोर आव्हान उभे करणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकूर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांचेही भवितव्य आज एव्हीएमशिनमध्ये बंद होत आहे.
मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्याचबरोबर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकूर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केलेय. याशिवाय मुख्यमंत्री विजय रुपानी तसेच उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि काँग्रेसचे जिवाभाई पटेल यांच्यात मेहसाणात अटीतटीची लढत आहे.
राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या गर्दीचे मतदानात किती रुपांतर होते, यावरच काँग्रेसचे भवितव्य अबलंबून आहे. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे काँग्रेला अच्छे दिन गुजरातमध्ये येणार का, याची उत्सुकता आहे.
राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड लागल्यावर ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसनेही कंबर कसली. यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये २५ ते ३५ पेक्षा जास्त प्रचारसभा घ्याव्या लागल्या. तर अनेक मंत्री आणि राजकीय पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात होते. तर अन्य राज्यातून भाजपने कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची कुमक मागवली होती. त्यामुळे भाजपसाठी ही खरी लढाई होती, हे स्पष्ट झालेय.
गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर विक्रमी मतदान झाले आहे. जवळपास ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी किती मतदान होते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, २०१२ च्या निवडणुकीत ९३ पैकी ५२ जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर काँग्रेसला ३९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या जागा वाढल्या तरी भाजपला हा मोठा धक्का असणार आहे. काँग्रेसच्या जागी कमी करण्यावर भाजपचा भर दिसून आला. मात्र, काँग्रेस ज्या आक्रमकपणे प्रचार केला. त्यावरुन काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच राहुल गांधी यांनी निकालानंतर पाहा, असे सांगत काँग्रेसला जास्तीच्या जागा मिळतील, असा दावा केलाय.