नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-4च्या गाईडलाईन्सची घोषणा केली आहे. अनलॉक-4मध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. अनलॉक-4च्या गाईडलाईन्सची १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या गाईडलाईन्सची घोषणा केली असली तरी राज्य सरकार मात्र यावरचे निर्बंध कायम ठेवू शकते.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार कंटेनमेंट झोन सोडून इतर भागांमध्ये जास्त सूट देण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून अनलॉक-4ची प्रक्रिया सुरू होणार असली, तरी ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंदच राहणार आहेत. पण देशातील आयटीआय सुरू करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. शिवाय नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या परवानगीनं शाळेच्या आवारात जाण्याची परवानगी देण्यात आलीय. ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
२१ सप्टेंबरपासून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय मेळावे, धार्मिक, शैक्षणिक, स्पोर्ट्स, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल, पण यासाठी फक्त १०० लोकच येऊ शकतील. २१ सप्टेंबरपासून ओपन एयर थिएटर्सही उघडता येणार आहेत. पण सिनेमा हॉल, स्विमिंग पूल आणि थिएटर ३० सप्टेंबरपर्यंत बंदच असतील.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या गाईडलाईन्सची घोषणा केली, असली तरी राज्य सरकार मात्र कोरोनाची परिस्थिती पाहून वेगळा निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सची आल्यानंतर मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी चर्चा करतात, त्यानंतर याबाबत निर्णय होतो. याआधीही केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनंतर अनेक गाईडलाईन्स महाराष्ट्र सरकारने लागू केल्या नाहीत.