Kargil Vijay Diwas : भारताने कारगिलचे युद्ध कसे जिंकले, जाणून घ्या घटनाक्रम

भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.  

Updated: Jul 26, 2020, 12:32 PM IST
Kargil Vijay Diwas : भारताने कारगिलचे युद्ध कसे जिंकले, जाणून घ्या घटनाक्रम title=

नवी दिल्ली: आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. याची आठवण म्हणून २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.  या युद्धामध्ये ५२७ भारतीय जवान शहीद झाले. तर  भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ४५० सैनिकांना कंठस्नान घातले.  १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले आणि भारताने पाकिस्तानवर कसा विजय मिळवला, याचा घेतलेला आढावा. 

* ३ मे १९९९- पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली. 
* १० मे १९९९- पाकिस्तानने द्रास, काकसार आणि मुशकोह या परिसरात घुसखोरी केल्याचे उघड झाले.
* २६ मे १९९९- भारतीय वायूदलाने घुसखोरी झालेल्या परिसरात एअर स्ट्राईक केला. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर हवाई तळावरुन मिग २१, मिग २३, मिग २७, जॅग्वार, मीराज २००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
* ५ जून १९९९- पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे पुरावे भारताने जाहीर केले.
* १० जून १९९९- पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. 
* १३ जून १९९९- भारतीय सैन्याने द्रास परिसरातील तोलोलिंग परिसरावर कब्जा मिळवला.
* १५ जून १९९९- अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली. 
* ४ जुलै १९९९- तब्बल ११ तासांच्या धुमश्चक्रीनंतर भारताने टायगर हिल्सवर पुन्हा कब्जा केला. . 
* ५ जुलै १९९९- भारतीय सैन्याने द्रास परिसरावर ताबा मिळवला. 
* ७ जुलै १९९९- भारतीय सैन्याने बटालिक परिसरावर पुन्हा कब्जा केला 
* ११ जुलै १९९९- पाकिस्तानने कारगिल परिसरातून सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केली. 
* १४ जुलै १९९९-  भारताकडून ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली. 
* २६ जुलै १९९९- कारगिल युद्धाच्या समाप्तीची औपचारिक घोषणा झाली.