नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जेएनयूच्या विद्यार्थी संघटनांना आज पुन्हा चर्चेसाठी बोलावले आहे. या बैठकीत कुलगुरु आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. विद्यार्थी संघटना जेएनयूचे कुलगुरु जगदीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अडून आहेत. काल संध्याकाळीही कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी संघटनांनी मोर्चे काढले. यावेळी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आएशी घोष आणि फॅकल्टीच्या प्रातिनिधीक मंडळाची मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांसोबत बैठक झाली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात जेएनयू प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचा विश्वास त्यांनी या विद्यार्थ्यांना दिला होता. त्यानुसार आज विद्यार्थी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांनी या विद्यार्थी संघटनांना चर्चेसाठी बोलावलंय.
जेएनयूच्या आवारात रविवारी झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी चार दिवसांनंतरही कोणाला अटक करण्यात आली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्यात येईल असा केवळ दावा करण्यात येतोय. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटत आहे.गेल्या चार वर्षांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरलेले कुलगुरू एम. जगदेश कुमार यांच्या अकार्यक्षमतेवर मोदी सरकारने तीव्र नापसंती व्यक्त केलीय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी जेएनयूचे कुलगुरू जगदेश कुमार यांची खरडपट्टी काढल्याची सूत्रांची माहिती आहे.