...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात

Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर   

सायली पाटील | Updated: Dec 20, 2024, 01:12 PM IST
...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात  title=
(छाया सौजन्य- रॉयटर्स) / Income Tax department eye on Lavish Wedding Expenses

Lavish Weddings On IT Radar: लग्नसोहळा म्हटलं की अनेकदा खर्चाचा डोंगरच डोळ्यांसमोर उभा राहतो. वधू वरांच्या कपड्यांपासून पाहुण्यांचा मानपान, खाण्यापिण्याचा खर्च, प्री वेडिंग, फोटोग्राफी, लग्नसोहळ्यासाठीच्या ठिकाणाचा खर्च अशा कैक खर्चांची न संपणारी यादी आणि त्यासाठी खर्च केली जाणारी रक्कम हा इथं एक चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा असतो. लग्नसोहळ्यानंतर या तणावाच्या वातावरणातून उसंत मिळताच नवविवाहित जोडपी निवांत क्षणांसाठी पर्यटनाचा पर्याय निवडतात. पण, आता हनिमूनऐवजी काही जोडप्यांना मात्र थेट आयकर विभागाच्या कार्यालयाची वाट धरावी लागू शकते. 

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कैक विवाहसोहळे देशभरात पार पडल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र लग्नसराईच्या दिवसांचाही वेग मंदावताना दिसत आहे. असं असलं तरीही नव्यानं लग्न झालेल्या जोडप्यांच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे. कारण, गडगंज खर्च झालेल्या लग्नसोहळ्यांवर थेट आयकर विभागाची नजर पडली आहे. बॉलिवूड कलाकार म्हणू नका किंवा इतर कोणी सेलिब्रिटींचं हजेरी असणारे विवाहसोहळे म्हणू नका भव्यतेनं मढलेले हे सर्व सोहळे आता Income Tax विभागाच्या रडारवर आले आहेत. 

विवाहसोहळ्यांमध्ये 7500 कोटी रुपयांचा बेहिशोबी खर्च 

ET (इकोनॉमिक टाइम्स) च्या माहितीनुसार जयपूरमध्ये 20 वेडिंग प्लॅनर्सकडे आयकर विभागाची धाड पडली असून, मागील वर्षभरामध्ये या लग्नसोहळ्यांमध्ये तब्बल 7500 कोटींच्या बेहिशोबी रकमेचा खर्च करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रोकड स्वरुपात खर्च करण्यात आलेली ही रक्कम बेहिशोबी असून, अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार त्यासाठी बनावट पद्धतीनं बिल बनवणाऱ्या संशयित एंट्री ऑपरेटर, हवाला एजंट, म्यूल अकाऊंट चालवणारे कैक व्यक्ती हैदराबाद आणि बंगळुरूतील साथीदारांच्या जोडीनं ही सूत्र चालवत असल्याचं म्हटलं जात आहे. प्रामुख्यानं श्रीमंतांच्या हे संपूर्ण चक्र धनाढ्यांच्या भव्य विवाहसोहळ्यांवर अवलंबून असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : 31 st Dec Celebration Planning : वर्षाचा शेवट अथांग समुद्राच्या साक्षीनं... IRCTC चं खास क्रूझ पॅकेज कसं बुक करायचं? 

डेस्टीनेशन वेडिंगसुद्धा वादाच्या भोवऱ्यात... 

आयकर विभागाकडून सुरु करण्यात आलेलं हे धाडसत्र पुढील काही दिवस सुरूच राहणार असून, या सत्रादरम्यान रोकड स्वरुपात करण्यात आलेले सर्व व्यवहार तपासले जाणार असून, यामध्ये 50 ते 60 टक्के रक्कम वेडिंग प्लॅनर्सच्या साथीनं खर्च करण्यात आल्याचं समजत आहे. येत्या काळात हा संपूर्ण तपास परदेशात होणाऱ्या डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत पोहोचणार असून, त्याव्यतिरिक्त पाहुणे आणि सेलिब्रिटींच्या प्रवासासाठी चार्टर्ड विमानांचं बुकींग आणि इतर कैक गोष्टी वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहेत. त्यामुळं येत्या काळात लग्नात वारेमाप खर्च करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी हा एक सौम्य इशाराच आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.