नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान आज कमांडर पातळीवरची चर्चा होणार आहे. एल ए सी वर तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधली चर्चेची ही नववी फेरी असणार आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या चर्चेसाठी माल्डो इथे सकाळी नऊ वाजता भेटणार आहेत. या बैठकीला दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित राहू शकतात. दरम्यान आक्रमकतेला आक्रमकतेनेच उत्तर द्यायला भारतीय सैन्य तयार असल्याचं भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितलं आहे.
गेल्या 8 महिन्यांपासून सुरू असलेला हा गतिरोध सोडविण्यासाठी अनेक राजनैतिक आणि सैन्य चर्चा झाल्या आहेत. परंतु आतापर्यंत कोणतेही मोठे यश मिळालेले नाही. 'वरिष्ठ कमांडर स्तरीय बैठक लवकरच आयोजित करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे आणि या संदर्भात आम्ही राजनैतिक व लष्करी वाहिन्यांशी संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी शुक्रवारी सांगितले.
यापूर्वी, नोव्हेंबरला एलसीजवळील चुशूल येथे दोन्ही बाजूंच्या 8 व्या फेरीच्या चर्चेचे आयोजन 6 नोव्हेंबरला केले होते. यावेळी सर्व संघर्ष बिंदूंमधून सैन्य मागे घेण्याबाबत दोन्ही बाजूंनी विस्तृत चर्चा झाली. यावेळी, दोन्ही बाजूंनी सैन्य आणि मुत्सद्दी संपर्क ठेवून इतर समस्या सोडवण्यास आणि सीमाभागात शांतता राखण्याचे मान्य करण्यात आले होते.
दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या कराराची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली जाईल, ज्यात सैनिकांना संयमित ठेवणे आणि गैरसमज टाळण्यावर सुनिश्चितता आणण्याचे यानंतर आलेल्या निवेदनात म्हटले आहे.