How To Book Retiring Room: प्रवासाला निघालं असता अनेकांच्याच प्राधान्यस्थानी कैक गोष्टी असतात. मुक्कामासाठी चांगलं हॉटेल हवं. ते महत्त्वाच्या ठिकाणांपासून नजीक असावं. रेल्वे स्थानक किंवा विमानतळापासून कमी अंतरावर असावं... या आणि अशा कैक गोष्टी आणि मागण्यांचा यात समावेश असतो. प्रवाशांचा हाच प्राधान्यक्रम लक्षात घेता रेल्वे विभागाच्या वतीनं त्यांच्यासाठी काही खास सुविधा देण्यात येतात. यातीलच एक सुविधा म्हणजे हॉटेलवजा खोलीची.
तुम्हीही रेल्वे प्रवास करत असाल आणि कोणा दुसऱ्या राज्यात किंवा शहरात खोली शोधत आहात तर, तुमच्या मुक्कामाचा प्रश्न रेल्वे विभागच सोडवेल. इथं खर्चाचा बोजा वाढण्याची चिंताही नसेल आणि मनाजोगी रुमही मिळून जाईल. यात मदत होणार आहे ती म्हणजे रेल्वेच्या एका नव्या सुविधेची.
रेल्वेच्या या सुविधेसंदर्भात फार कमीजणांना माहिती असून, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या 304 बेड असणाऱ्या रिटायरिंग रूमचं लोकार्पण केलं. ज्यामुळं रेल्वे प्रवासादरम्यान मुक्कामासाठी हॉटेल शोधणाऱ्यांची चिंता आता मिटणार आहे. IRCTC च्या अॅपच्या माध्यमातूनही या रुमची बुकिंग करता येणार आहे. त्यामुळं पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत रेल्वेची वाट पाहताना आता रेल्वे स्थानकावरच तासन् तास बसण्यापेक्षा किरकोळ रक्कम मोजून तुम्ही या रुममध्ये विश्रांती करू शकता. पूर्णपणे वातानुकूलित अर्थात AC असणाऱ्या या खोलीमध्ये रात्रीचं भाडं म्हणून 100 रुपये ते 700 रुपये इतकी रक्कम आकारली जाते.