Nepal Airplane Crash : रविवारी नेपाळमध्ये (Nepal) झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत 72 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विमान कोसळल्यानंतर ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या विमानामध्ये 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. या अपघातात एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आले नाही. नेपाळ लष्कराचे (Neapl Army) प्रवक्ते कृष्ण प्रसाद भंडारी यांनी ही माहिती दिली आहे. विमान अपघातात (Airplane Crash) कोणीही जिवंत सापडलेले नाही. सोमवार सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे, असे भंडारी म्हणाले.
पाच भारतीयांचा समावेश
रविवारी सकाळी साडेदहा वाजता एटीआर-72 या विमानाने काठमांडूच्या (kathmandu) त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. पोखराकडे (pokhara) जात असलेले हे विमान लॅंडिंगपासून काही अंतरावर असताना कोसळले. विमान कोसळताच विमानाने पेट घेतला आणि काही वेळातच त्याचा कोळसा झाला. या विमानात पाच भारतीय देखील प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुलगा झाल्याने दर्शनासाठी गेला आणि...
या अपघातात अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. नेपाळ विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सोनू जैस्वाल नावाच्या एका व्यक्तीचाही समावेश होता. सोनू जैस्वाल हा मुलगा झाल्याने नवस फेडण्यासाठी काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला होता. मात्र विमान अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनूचे नातेवाईक आणि चक झैनाब गावचे प्रमुख विजय जैस्वाल यांनी सांगितले की, सोनू जैस्वाल (35) यांना दोन मुली आहेत आणि त्यांनी पशुपतीनाथांना जर मला मुलगा झाला तर मी मंदिरात दर्शनासाठी येईन असा नवस केला होता.
'सोनू त्याच्या तीन मित्रांसह 10 जानेवारीला नेपाळला गेला होता. मुलगा होण्याची इच्छा पूर्ण झाल्याने भगवान पशुपतीनाथाचे दर्शन घेण्याचे सोनूचे एकमेव उद्दिष्ट होते. पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले होते. त्यांचा मुलगा अवघ्या सहा महिन्यांचा आहे, अशी माहिती विजय जैस्वाल यांनी दिली.
सोनू परतलाच नाही
सोनूचे दारूचे दुकान असून त्याचे अलवलपूर चाटी येथे घर आहे. पण सध्या तो वाराणसीच्या सारनाथ येथे राहत होता. मृतांमध्ये सोनूचे इतर तीन मित्र अभिषेक कुशवाह (25), विशाल शर्मा (22) आणि अनिल कुमार राजभर (27) यांचाही समावेश आहे. विमान अपघाताची बातमी पसरताच, जवळपास संपूर्ण गाव सोनूच्या घराबाहेर जमले आणि प्रार्थना करु लागले होते. कारण त्यांना आशा होती की तो बरा होईल. मात्र जिल्हा प्रशासनाचे सोनूच्या दुःखद निधनाची बातमी दिली. सोनूच्या कुटुंबियांना अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही.
पोखरा येथे पॅराग्लायडिंगनंतर सोनू आणि त्याचे तीन मित्र मंगळवारी गाझीपूरला परतणार होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. नेपाळमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे चौघे पोखराला जाण्यापूर्वी पशुपतीनाथ मंदिराजवळ आणि त्यानंतर थामेल येथील हॉटेल डिस्कव्हरी इनमध्ये राहिले. पोखराहून गोरखपूरमार्गे ते भारतात परतणार होते.
दरम्यान, सोनू जैस्वालने या अपघाताआधी फेसबुक लाईव्ह केले होते. या अपघाता व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोनू मित्रांसोबत विमानात बसलेला दिसत होता. त्यानंतर विमान कोसळताच त्याने पेट घेतला. ही सर्व घटना फेसबुक लाईव्हमध्ये रेकॉर्ड झाली