नवी दिल्ली : भारतीय सैन्याने ( Indian Army) पाकिस्तान (Pakistan) व्याप्त काश्मीरमध्ये (pok) आतंकवाद्यांचे लॉन्चिंग पॅड उद्वस्त ( strikes on terror launchpads) केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांविरूद्ध कठोर कारवाई करून भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली आहे. पीओकेमध्ये भारताने 'पिन पॉईंट स्ट्राइक' केली आहे.
हिवाळा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान सैन्य जास्तीत जास्त दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात पाठवण्याच्या मन: स्थितीत आहे. २५० ते ३०० अतिरेकी पीओकेच्या लॉन्चिंग पॅडमध्ये आहेत आणि ते भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ११ दहशतवादी ठार मारल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रमुख राकेश अस्थाना यांनी सांगितले की, गुरुवारी नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवादी घुसखोरांच्या प्रयत्नांमध्ये होते. काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्यापूर्वी अतिरेकी कारवाईवर लक्ष ठेवण्यात येत होते. सुरक्षा दल या परिस्थिती सामोरे जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सैन्य पूर्णपणे तयार आहे.
नियंत्रण रेषेतून घुसखोरीचा प्रयत्न हा अति बर्फवृष्टी होण्यापूर्वी पाकिस्तानातून दहशतवादी घुसखोरीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु बीएसएफ आणि इतर सर्व एजन्सी आणि सुरक्षा दल सज्ज आहेत आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत, अशी माहिती लष्कराच्या हवाल्याने सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, जम्मू काश्मिरच्या नगरोटा जिल्ह्यातील बन टोल प्लाझा भागात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं. ट्रकमधून हे दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या दिशेने जात होते.. पहाटे ४ वाजता ही चकमक झाली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारु गोळा भरलेला होता.गोळीबारात ट्रकमध्ये मोठा स्फोट झाला.