ISRO ला मोठा धक्का! 100th Missionमध्ये तांत्रिक बिघाड, अंतराळातच अडकली सॅटलाइट

ISRO 100th Mission: अलीकडेच ISRO ने आपले 100 वे मिशन लाँच केले होते, ज्याचे जगभरात कौतुक झाले होते, मात्र ISRO आता या मिशनमध्ये मोठी समस्या आली आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 3, 2025, 09:44 AM IST
ISRO ला मोठा धक्का! 100th Missionमध्ये तांत्रिक बिघाड, अंतराळातच अडकली सॅटलाइट title=

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISRO ने नुकतीच त्यांची 100 वे रॉकेट मिशनची सुरूवात केली होती. या मिशनचे सगळ्यांकडून खूप कौतुक झाले होते. मात्र आता याच मिशनबाबत एक वाईट बातमी येत आहे. त्या रॉकेट मिशनमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. बुधवारी प्रक्षेपित केलेला नेव्हिगेशन उपग्रह NVS-02 तांत्रिक बिघाडामुळे त्याच्या अभिप्रेत कक्षेत पोहोचू शकला नाही. याबद्दल आपल्या वेबसाईटवर अपडेट देताना इस्रोने सांगितले की, 'उपग्रह नेमून दिलेल्या ठिकाणी नेण्याच्या प्रक्रियेत अडचण आली आहे.'

काय समस्या येत आहे? 

कक्षा वाढवण्यासाठी, उपग्रहाच्या इंजिनला ऑक्सिडायझर पुरवणारे व्हॉल्व्ह उघडू शकले नाहीत, त्यामुळे त्याची उंची वाढली आणि पुढील काम होण्यास अडचणी निर्माण झाल्या. हा उपग्रह यू आर राव उपग्रह केंद्राने तयार केला होता आणि तो जियोस्टेशनरी कक्षेत ठेवला जाणार होता. मात्र, त्याच्या लिक्विड फ्युएल इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याला आता नेमलेल्या कक्षेत पाठवण्यात अडचण येत आहे.

होते वर्षातील पहिले मिशन

बुधवारी सकाळी 6.23 वाजता इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F15 रॉकेटद्वारे NVS-02 चे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही नारायणन यांच्यासाठीही हे मिशन महत्त्वाचे होते, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हे पहिले प्रक्षेपण होते. शिवाय इस्रोचे या वर्षातील हे पहिलेच मोठे मिशन आहे. मात्र, आता तांत्रिक बिघाडांमुळे मोहिमेचे यश संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

शास्त्रज्ञ शोधात आहेत दुसरा पर्याय 

घडलेल्या घटनेमुळे आता असे सांगण्यात येत आहे की, इस्रोचे शास्त्रज्ञ या उपग्रहाचा आणखी काही उपयोग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.  जेणेकरून त्याचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे माहिती मिळविण्यासाठी करता येईल. 

काय होता मिशनचा उद्देश? 

NVS-02 उपग्रहाचा उद्देश भारताची स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली, NavIC मजबूत करणे हा होता. 1999 च्या कारगिल युद्धानंतर भारताने विकसित केलेली नाविक ही एक प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली आहे जी अमेरिकेच्या GPS प्रमाणे काम करते. कारगिल युद्धादरम्यान, भारताला अमेरिकेकडून उच्च-स्तरीय GPS डेटा मिळू शकला नाही, त्यानंतर सरकारने स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली तयार करण्याचा निर्णय घेतला.