ISRO chandrayaan 3 : इस्रोच्या चांद्रयान मोहिमेला यश मिळाल्यानंतर मात्र या मोहिमेतील प्रज्ञान रोव्हरचा पुढं संपर्क होऊ शकला नाही. ज्यामुळं ही मोहिम तिथंच थांबली असा अनेकांचाच समज झाला. पण, इस्रोनं याच मोहिमेसंदर्भात एक महत्त्वाचा दावा केला आहे. ज्याअंतर्गत ही मोहिम अद्याप सुरुच असून, ती यापुढीही सुरु राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
चांद्रयान 3 या मोहिमेमुळं भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात अनेक नवनवीन खुलासे झाले. चंद्राच्या भूमीपासून तिथं येणाऱ्या भूकंपांपर्यंतची माहितीही यातून समोर आली. या मोहिमेला अपेक्षित यश मिळालं असलं तरीही मोहिमेचा पुढचा टप्पा अर्थात मानवाचं पाऊल जोपर्यंत चंद्रावर पडत नाही, तोपर्यंत ही चंद्रमोहिम सुरुच राहणार असल्याची माहिती इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या चंद्रावरून रोव्हरच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक विश्लेषणं सुरु आहेत. इतकंच नव्हे, तर भारतीय व्यक्ती/ अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यासाठीचे प्रयत्न सध्या इस्रो सातत्यानं करत असून, त्या दृष्टीनं अनेक संशोधनंही सुरु आहेत.
वरील हेतू केंद्रस्थानी ठेवत एखादी वस्तू किंवा एखादा घटक चंद्रावर पाठवण्याची मोहिम हाती घेत तो सुस्थितीत पृथ्वीवर परत आणण्यासाठी इस्रोचं काम आणि प्रयत्न सुरु असल्याची माहितीसुद्धा सोमनाथ यांनी दिली. येत्या काळात इस्रोकडून एखादी वस्तू अंतराळात पाठवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येणार असून, त्यामागोमाग भारतातील पहिली मानवी मोहिम, गगनयान या वर्षअखेरपर्यंत प्रक्षेपित होऊन त्यावरच वैज्ञानिकांच्या नजरा असतील.
इस्रोच्या या मानवी गगनयान मोहिमेअंतर्गत तीन व्यक्तींना / अंतराळवीरांना 400 किमीपर्यंतच्या कक्षेत तीन दिवसांसाठी पाठवून त्यांना पृथ्वीवर परत आणलं जाणार आहे. दरम्यान, सध्या प्रक्षेपकाची क्षमता वाढवण्यासाठी इस्रोनं कार्बन नोझल तयार केलं असून, धातूच्या तुलनेत ते अतिशय हलकं असल्याचं सांगण्यात येत आहे.