2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य

पोलिक्सच्या श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास हा पेलोड करणार आहे. पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचे निरीक्षण या पेलोडच्या मदतीने केले जाणार आहे.    

वनिता कांबळे | Updated: Dec 31, 2023, 10:02 PM IST
 2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट;  ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य title=

ISRO XPoSAT  :  2023 या वर्षात भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली. तर, दुसरीकडे ISRO चे आदित्य L1 हे यान देखील सूर्याकडे झेपावले असून ही मोहिम सध्या यशस्वी टप्प्यात आली. 2024 या वर्षात नवा विक्रम रचण्यासाठी भरातीय अंतराळ संस्था ISRO पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 2024 च्या पहिल्याच दिवशी  ISRO मार्फत XPoSAT हे पावरफुल सॅटेलाईट लाँच केले जाणार आहे. अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होलचा ISRO शोध
 घेणार आहे. 

अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातील अनेक रहस्यांचा उलगडा झालेला नाही. यामुळे अंतराळात नेमकं काय याचे कुतूहल सर्वांनाच आहे. भारताचे सॅटेलाईट अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल शोधणार आहे. भारतीय अंतराळ संस्था ISRO सिक्रेट मोहिम राबवणार आहे.  XPoSAT असे या मोहिमेचे नाव आहे. चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताची ही मोहिम अतिशय महत्वाची मानली जात आहे. 1 जानेवारी 2024 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या सॅटेलाईटचे प्रक्षेपण होणार आहे. PSLV रॉकेट मालिकेतील 60 वे प्रक्षेपण आहे. 

ISRO चा XPoSAT उपग्रह अवकाशात झेपावणार

चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. यानंतर प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर यांनी चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडली.  Aditya-L1 ही सौरमोहिम देखील यशस्वी टप्प्यात आहे. गगनयान मोहिमेवर देखील काम सुरु आहे. यासोबतच इस्रो आता नव्या मोहिमेची तायरी करत आहे. क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह म्हणजेच XPoSAT सॅटेलाईट 25 डिसेंबर पर्यंत अवकशात झेपावणार आहे.  पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) रॉकेटच्या मदतीने हा उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

ब्लॅक होल शोधणार   

XPoSAT सॅटेलाईट अंतराळात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करणार आहे. किरणोत्सर्गाच्या स्रोतांची छायाचित्रे देखील या सॅटेलाईटच्या मदतीने घेतली जामार आहेत. XPoSAT सॅटेलाईटवर बसवण्यात आलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेने बनवली आहे.  XPoSAT उपग्रह हा अंतराळातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे. पल्सर, सुपर नोव्हा,  ब्लॅक होल, एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा यांचा देखील या उपग्रहाच्या मदतीने शोध घेतला जाणार आहे.  

9.50 कोटींचे सिक्रेट मिशन

हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत म्हणजेच लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये 500 ते 700 किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. 2017 मध्ये इस्रोने या मोहिमेवर काम सुरू केले होते. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये आहे. या उपग्रहामध्ये दोन पेलोड आहेत. POLIX आणि  XSPECT अशी या पेलोडची नावे आहेत. पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे.  रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे हा पेलोड तयार केला आहे. या पेलोडचे वजन 126 किलो आहे. अंतराळातील 8-30 keV रेंजमधील एनर्जी बँडचा तसेच अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा हा पेलोड अभ्यास करणार आहे. XSPECT म्हणजे एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी पेलोड 0.8-15 keV  रेंजमधील एनर्जी बँडचा अभ्यास करेल.