म्हाडाकडून लवकरच पुन्हा जाहीर होणार लॉटरी; 'या' मोक्याच्या ठिकाणी असणार 1173 घरे

Mhada Lottery 2025: आता तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. लवकरच म्हाडा कोकण मंडळाकडून लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2025, 11:58 AM IST
म्हाडाकडून लवकरच पुन्हा जाहीर होणार लॉटरी; 'या' मोक्याच्या ठिकाणी असणार 1173 घरे
Mhadas Konkan board announces lottery for 1173 house in thane chitalsar

Mhada Lottery 2025: मुंबई, ठाणे यासारख्या भागात घर घ्यायचं म्हणजे घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. त्यामुळं घर घेणे महाग ठरतं. मात्र म्हाडाकडून दरवर्षी विविध ठिकाणी घरांसाठी लॉटरी काढण्यात येते. गेल्याच वर्षी म्हाडाकडून मुंबईत दोन हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. आता लवकरच म्हाडा कोकण मंडळाकडून पुन्हा एकदा 2 हजार घरांकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. 

म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांना आता निराश होण्याचे कारण नाही. येत्या काही महिन्यांत म्हाडाचे कोकण मंडळ सुमारे २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यात चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा समावेश असणार आहे. 

 म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ३० हजार घरांची सोडत काढण्याचे नियोजन असून दर तीन ते सहा महिन्यांत म्हाडाच्या कुठल्या तरी मंडळाची सोडत काढण्याचे प्रस्तावित आहेत. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन सोडत काढल्या आहेत. त्यामुळं सुमारे दहा हजार जणांचे घरांचे स्वप्न साकार झाले आहेत. आता यंदाही सुमारे दोन हजार घरांची सोडत काढण्याची कोकण मंडळाची तयारी आहे. 

चितळसर येथे म्हाडाने उभारलेल्या 1173 घरांसह 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गंत आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गंत हाउसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचादेखील समावेश असणार आहे. 

म्हाडाला लागली घरांची 'लॉटरी' 

मुंबई शहर आणि उपनगरात घरे बांधण्यास जागा शिल्लक नसल्याने म्हाडाच्या घरांच्या लॉटरीवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना परवडणाऱ्या दरातील घरे लॉटरीसाठी उपलब्ध व्हावी म्हणून आता म्हाडा आणि एसआरए संयुक्तपणे रखडलेले १७प्रकल्प राबवणार आहेत. याद्वारे सुमारे २५ हजार घरे बांधली जाणार असून, यातील निम्मी घरे लॉटरीसाठी उपलब्ध होतील, असा दावा म्हाडाने केला आहे. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या १७ प्रकल्पांना गती देण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी 
दिले आहेत.