आधी भावाचे अपहरण, फोन करुन तिला बोलावलं अन्...; भिवंडीत 6 नराधमांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Bhiwandi Rape Case: भिवंडीत तरुणीवर सहा नराधमांनी एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 23, 2025, 12:11 PM IST
आधी भावाचे अपहरण, फोन करुन तिला बोलावलं अन्...; भिवंडीत 6 नराधमांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार
Bhiwandi police books six for gangrape of woman in Thane

उमेश जाधव, झी मीडिया

Bhiwandi Rape Case: भिवंडीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भावाचे अपहरण करत त्यास मारहाण करत त्याच्या बहिणीला रात्री उशीरा खोटे कारण सांगून बोलावून घेत तिच्यावर निर्जन ठिकाणी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन शांतीनगर पोलीस ठाण्यात सहा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शहरातील शांतीनगर परिसरातील फातमा नगर येथे राहणारी २२ वर्षीय तरुणी शेलार येथे आपल्या आत्या बहिणीकडे कडे गेली होती. रात्रीच्या सुमारास तिला भावाचे १५ मिसकॉल आले होते. १२ वाजताच्या सुमारास तिला अचानक जाग आली असता तिने मोबाईल मधील मिसकॉल बघून भावाकडे चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यावेळी
भावाने ,"माझी तब्येत बरी नाही तु बागे फिरदौस या ठिकाणी ये" असे सांगितल्याने पीडित तरुणी आपल्या ओळखीच्या रिक्षावाल्यासोबत बागे फिरदौस येथे आली. त्याठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेले आरोपी सदरे उर्फ मोहम्मद साइद आलम, पाशा, लड्डु, गोलु व इतर दोन जण सर्व रा.फातमा नगर यांनी आपसांत संगनमत करून पीडितेसह तिचा भाऊ व रिक्षा चालक यांना मारहाण करून अपहरण करीत जबरदस्तीने रिक्षा मध्ये बसवूले. त्यानंतर नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडा झुडपात नेवून तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती बलत्कार केला.

इतकंच नव्हे तर नराधम तिला पुन्हा फातमा नगर येथे घेऊन गेले. तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीमध्ये पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने आळी-पाळीने बलात्कार करून धमकावून पीडित तरुणी, तिचा भाऊ व रिक्षा चालक यांना सोडून पसार झाले. या घटनेनंतर भयभीत पीडित तरुणीने भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपल्या बरोबर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पहिला गुन्हा शांतीनगर पोलिस ठाण्यात घडला असल्याने तो शांतीनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी या बाबत बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे आणि सदरे नावाच्या आरोपीचे प्रेमप्रकरण होते. कित्येक वर्षांपासून ते नात्यात होते. मात्र गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते.  तसंच, पीडित तरुणीचे अन्य एका मुलासोबत नाव जोडले गेले होते. त्यामुळं आरोपीला त्याचा राग आला होता. याच रागाच्या भरात त्याने तरुणीला अद्दल घडावी या हेतूने तिच्यासोबत हे क्रुर कृत्य केले.