Champion Trophy 2025 PAK vs NZ Karachi Video: चॅपियन्स ट्रॉफीला बुधवारपासून सुरुवात झाली. कराचीमधील मैदानावर या स्पर्धेतील पहिला सामना पार पडला. न्यूझीलंडविरुद्ध यजमान पाकिस्तानदरम्यानचा हा सामना पाहुण्या संघाने 60 धावांनी जिंकला. या स्पर्धेमधील भारताचे सामने वगळता सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तवर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला नसून भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या इतर सर्व देशांचे संघ पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. मात्र पहिल्याच सामन्यात घडलेल्या एका प्रसंगावरुन हे संघ देखील दहशतीखालीच आहेत की काय अशी शंका नेटकऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे.
झालं असं की, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरु झाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला. पहिला चेंडू निर्धाव गेला. मात्र पहिला चेंडू टाकण्यापूर्वी जेव्हा खेळाडू मैदानात येण्याच्या तयारी होते तेव्हा पाकिस्तानी एअरफोर्सकडून ही मालिका सुरु होत असल्याबद्दल हवाई सलामी देण्यात आली. त्यानिमित्त कराचीमधील राष्ट्रीय क्रिकेट मैदानावरुन पाकिस्तानी हवाई दलाच्या 10 विमानांनी उड्डाण केलं. या विमानांनी आकाशात पांढरा आणि हिरवा हा पाकिस्तानी राष्ट्रीय ध्वजामधील रंगाचा धूर सोडत अनोखं अभिवादन केलं. मात्र अचानक मैदानावर ही विमान दिसली आणि जोरदार आवाज झाल्याने न्यूझीलंडच्या सलामीवीरांबरोबरच प्रेक्षकांनाही भलतीच शंका आली.
सदर विमानं ही हवाई हल्ला करण्याच्या उद्देशाने तर आली नाहीत ना अशी शंका त्यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या अनेकांना वाटली अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. यासाठी ही विमानं मैदानावरुन गेली त्यावेळी प्रेक्षकांबरोबरच खेळाडूंनी दिलेल्या विचित्र प्रतिसादाचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. व्हिडीओमध्ये विमानांचा आवाज झाल्यानंतर ग्लोज घालून मैदानात उतरायच्या तयारीत असलेले न्यूझीलंडचे खेळाडू खाली वाकून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याप्रमाणे प्रतिसाद देताना दिसतात तर प्रेक्षकांपैकी अनेकजण कान दाबून घेत घाबरलेल्या अवस्थेत दिसून येतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी अगदी पाहुणा संघ घाबरुन जाईल एवढा शो ऑफ करायची गरज नाही, असा टोला पाकिस्तानी आयोजकांना लगावला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांपैकी केवळ भारतीय संघ पाकिस्तानबाहेर सामने खेळणार असून भारताचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध आहे.