पटना : बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक हालचालींना वेग आला आहे. आता जीतनराम मांझी यांचा पक्ष महाआघाडीपासून विभक्त झाला आहे. मांझी यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीने हा निर्णय घेतला आहे. यापुढे ते महाआघाडीचा भाग असणार नाहीत. पण जीतनराम मांझी जेडीयूबरोबर जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जीतनराम मांझी यांच्या घरवापसीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून हालचाली सुरु होत्या. मांझीचा पक्ष हा जेडीयूमध्ये पूर्णपणे विलीन झाला पाहिजे, अशी जेडीयूची इच्छा आहे, पण तसे न झाल्यास मांझी यांच्या पक्षासोबत काही जागांचा वाटाघाटी करुन त्यांना सोबत घेतलं जाईल.
आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीतनराम मांझी यांचा पक्ष जेडीयूशी हातमिळवणी करणार की नाही हे अद्याप जाहीर झालेलं नाही, परंतु जेडीयू आणि मांझी यांच्यात बोलणी झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अलीकडेच श्याम रजक यांना नितीशकुमारांनी मंत्रिमंडळातून काढल्यानंतर त्यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला होता. श्याम रजक यांनी नितीश सरकारला दलितविरोधी म्हटले होते. 'बिहारमध्ये असे कोणतेही पोलीस स्टेशन नाही की जिथे खून, बलात्कार आणि दलितांचा विनयभंग झाला नाही.' असा आरोप श्याम रजन यांनी केला होता.
श्याम रजक यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना जीतनराम मांझी म्हणाले होते की, श्याम रजक हे इतके दिवस मंत्रिमंडळात फायदा घेतल्यानंतर निवडणुकीच्या वेळी नितीशकुमारांना दलितविरोधी म्हणत होते, हे न्याय्य ठरू शकत नाही. मांझी यांचे विधान त्यांच्या घरी परतण्याचे संकेत मानले जात आहेत.