Job News : नोकरीमुळं अनेकांनाच आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, जीवनातील अनेक महत्त्वाची स्वप्न पूर्ण करण्याचीही संधी मिळते. भारतात सध्या अशा नोकरदार वर्गाची संख्या मोठी असून, या नोकरदार वर्गातील अनेकजण विविध कारणांनी यापूर्वीच्या काही वर्षांच्या तुलनेत सध्या अधिक प्रमाणात कर्जत बुडताना दिसत आहे.
मागील दोन वर्षांमध्ये कर्ज घेणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती एका सर्वेक्षणातून उघड झाली आहे. ज्यानुसार नोकरी करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांनी 25 लाखांहून अधिक किमतीचं कर्ज घेतलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही हा आकडा मोठाच आहे. महानगरांमध्ये कर्ज न घेतलेल्यांच्या आकड्यात आला घट आली असून, नोकरी करणाऱ्या बहुतांश महिला वर्गावर Home Loan अर्थात गृहकर्ज असल्याची माहिती या निरीक्षणपर अहवालातून समोर आली आहे.
बँक बाजार (BankBazaar) नं केलेल्या या सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला फक्त 13.4 टक्के नोकरदार वर्गाकडे कर्ज नाही. 2022 मध्ये हा आकडा 19 टक्के इतका होता. तर, गेल्या दोन वर्षांमध्ये कैक नोकरदार व्यक्तींनी कोणत्या न कोणत्या कारणानं कर्ज घेतल्याचं उघड झालं, ज्यांची आकडेवारी 91.2 टक्क्यांवर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या आकडेवारीत वाढ झाली आहे. मागील वर्षी ही आकडेवारी 88 टक्के इतकी होती.
सर्वेक्षणासाठी 22 ते 45 वर्षे वयोगटातील 1,529 जणांचा सहभाग नोंदवण्यात आला होता. साधारण 6 महानगरातील 18 टियर आणि 2 शहरातील नोकरी करणाऱ्यांनी या सर्वेक्षणात सहभागी होत आपली मतं नोंदवली, ज्यामध्ये 40 टक्के महिला होत्या. शिवाय सर्वेक्षणातील अनेकांचं वेतन 30 हजार रुपये आणि त्याहूनही कमी होतं.
नोकरदार वर्गाकडून कर्ज, क्रेडिट कार्ड आणि इतर फायनॅन्शिअल प्रोडक्टचा केला जात असून, त्यांनी डिजिटल माध्यमातून व्यवहाराला सर्वाधिक पसंती दिली आहे. सर्वेक्षणानुसार 22 ते 27 वर्षे वयोगटातील तरुणांना नव्या तंत्रानाची चांगली माहिती असून, 28 ते 34 वर्षे वयोगटातील मोठा वर्ग नोकरी आणि इतर आर्थिक गरजांसमवेत भटकंतीसाठी खर्च करण्यालाही प्राधान्य देत आहे. यामध्ये आणखी एका गोष्टीसाठी त्यांच्याकडून खर्च केला जातोय, ती म्हणजे खासगी वाहन.
भारतीय नोकरदार वर्गामध्ये घर खरेदीला सर्वार्थानं प्राधान्य दिलं जात असून, यानंतर आरोग्य, नातेसंबंध आणि प्रगतीला प्राधान्य दिलं जात आहे. त्याशिवाय प्रवास आणि निवृत्तीनंतरचे बेतही विचारात घेतले जात आहेत. सध्याची तरुणाई स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्याच विचारात असल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं गेलं. कर्जाच्या माध्यमातून एकिकडे गरजा भागत असल्या तरीही प्रत्यक्षात मात्र या कर्जाची परफेड करताना अनेकांनाच घाम फुटत आहे हीच या सर्वेक्षणातून समोर आलेली वस्तूस्थिती.