Kangana Ranaut On Loksabha 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिने केलेली वक्तव्य खूप गाजतात. अलीकडेच कंगना लोकसभा 2024ची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कंगनाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता तिच्या कुटुंबातील एका सदस्यानेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना भाजपाकडून लोकसभा निवडणुक लढणार असण्याची माहिती तिच्या वडिलांनीच दिली आहे.
कंगना 2024ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या वृत्ताला तिचे वडिल अमरदीप रणौत यांनीच दुजोरा दिला आहे. भाजपच्या तिकिटावरच कंगना लोकसभा निवडणुकीला उभी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ती कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कंगनाच्या कुलु येथील घरी त्यांची भेट घेतली होती. त्यांनंतर कंगना लोकसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता.
कंगना रणौत लोकसभा निवडणुक लढवेल. जर भाजपने तिला तिकिट दिलं तर ती लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे, असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. तसंच, भाजपा कंगनाला हिमाचल, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवु शकते. जर हिमाचलमधून पक्षाने कंगनाला तिकिट दिलं तर ती मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढेल.
मागील आठवड्यात हिमाचलमधील बिलासपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सोशल मीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे कंगनाने उपस्थिती दर्शवली होती. तसंच, आरएसएसच्या विचारसरणीप्रमाणेच माझे विचार असल्याचे वक्तव्य तिने केले होते. दरम्यान, कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा आहे.
अभिनेत्री कंगना रणौत मुळ गाव मंडी जिल्ह्यातील सरकाघाट विधानसभा क्षेत्रातील भांबला हे गाव आहे. तिचे मनाली येथेही घर आहे. त्यामुळं तिचा पूर्ण परिवार आता मनाली येथेच राहतो. काही महिन्यांपूर्वीच कंगनाने ती लोकसभा निवडणूक उत्सुक असल्याचे म्हटलं होतं. गुजरातयेथील द्वारकामध्ये पत्रकारांसोबत बोलत असताना तिने स्पष्ट केले होते की, तर देवाची कृपा असेल तर मी नक्कीच लोकसभा निवडणुक लढवेन. त्यामुळं आता कंगना भाजपच्या तिकिटावरुन लोकसभेला उभी राहणार असल्याच्या चर्चांवर तिच्या वडिलांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.