Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेस (Congress) बाजी मारणार की भाजप (BJP) सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आलाय. उद्या म्हणजे 13 मे रोजी दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडं. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधीं, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधींनी कर्नाटक अक्षरश: पिंजून काढला होता.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे 13 तारखेला ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. एक्झिट पोल अंदाजानुसार कर्नाटकमध्ये त्रिशंकू सरकारची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षात चिंतेचं वातावरण आहे.
प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे
काँग्रेसने प्रचारात बोम्मई सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बोम्मई सरकारवर 40 कमिशनखोरीचा आरोप, महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपवर निशाणा, बजरंग दल आणि PFI वर बंदी घालण्याचे आश्वासन , सत्तेत आल्यास मुस्लिमांना पुन्हा 4 % आरक्षण लागू, महिलांना 2 हजार रुपये मासिक वेतन, बसमधून महिलांना मोफत प्रवास, पदवीधारकांना 3 हजार रुपये बेरोजगार भत्ता, डिप्लोमाधारकांना 1500 रूपये बेरोजगार भत्ता, प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ मोफत आणि सामान्यांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज ही आश्वासनं दिली आहेत.
तर भाजपने डबल इंजिन सरकार आल्यास गतिमान विकास, बजरंग दलावर बंदी म्हणजे बजरंग बलीचा अपमान, मुस्लिमांचं रद्द केलेलं आरक्षण लिंगायत, होक्कलिगा समाजाला देणार, वर्षभरातून सर्वांना 3 गॅस सिलिंडर मोफत आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध मोफत अशी आश्वासनं दिली आहेत. दुसरीकडे जेडीएसने वर्षाला 5 गॅस सिलिंडर मोफत आणि ऑटोरिक्षाचालकांना महिना 2 हजार रुपये भत्ता अशी मोठी आश्वसानं दिली आहेत.
गेल्या पाच निवडणुकांचे निकाल
भाजप - 1999 मध्ये 44 जागांवरुन 2004 मध्ये थेट 79 धावांवर मजल. तर 2008 मध्ये सर्वाधिक 110 जागा. 2013 मध्ये 40 जागांवर समाधान, पण 2018 मध्ये दमदार पुनरागमन करत 104 जागा पटकावत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसने 1999 मध्ये 132 जागा जिंकत मोठा विजय मिळवला होता. पण 2018 मध्ये 80 जागांवर समाधान मानावं लागलं.